कर्जत : तालुक्यातील वेणगाव येथे असलेल्या रेशन दुकानातील ५००हून अधिक क्विंटल मालाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली होती. कर्जत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल ६२१ क्विंटल रेशनिंगचा ५ लाख ९७ हजार रुपयांचा साठा जप्त केला. महसूल विभागाच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून याबाबत रेशन दुकानदार आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वेणगाव येथे शासनाचे रास्त धान्य दुकान असून ते सुहास परशुराम तुपे यांच्या नावावर आहे. त्यांच्या वेणगाव गावातील रास्त धान्य दुकानातील गहू आणि तांदूळ हे धान्य भेसळ करण्यासाठी तसेच चढ्या भावाने विक्री करण्यासाठी गोणी भरून नेले जाणार असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली होती. रेशन दुकानदार तुपे हे आपले सहकारी संजय अग्रवाल आणि मंगेश गायकवाड यांच्या मदतीने गोण्या भरलेला माल वेणगावमधून लंपास करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ६२१ क्विंटल माल गळाला लागला आणि मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी सापळा रचून पंचांच्या मदतीने ५७१ क्विंटल गहू आणि ५० क्विंटल तांदूळ असा माल अवैधरीतीने नेताना पकडला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, कर्जतचे पोलीस निरीक्षक अरुण भोर, सहायक पोलीस निरीक्षक पाटील, अन्य कर्मचारी यांच्या मदतीने छापा मारून अवैध मार्गे जाताना थांबविण्यात यश आले.
रास्त धान्य दुकानातील धान्याच्या अवैध वाहतुकीचा साधारण ५ लाख ९७ हजारांचा साठा जप्त केल्यानंतर कर्जत पोलिसांकडून महसूल विभागातील पुरवठा विभागाला बोलावून घेतले. त्यानंतर महसूल विभागाच्या पुरवठा शाखेचे निरीक्षक सोपान रामकृष्ण बाचकर हे तेथे पोहोचले आणि त्यांनी अवैध वाहतूक करण्यात येत असलेला माल रेशन दुकानात रेशनकार्डधारक यांना देण्यासाठी आणला होता हे मान्य केले.रेशन दुकानदार सुहास परशुराम तुपे, संजय अग्रवाल आणि मंगेश गायकवाड यांच्यावर सरकारी धान्याची अवैधरीत्या वाहतूक करणे, भेसळ करण्यासाठी धान्याची चोरी करणे, बाजारात चढ्या भावाने विक्री करण्यासाठी अवैधरीत्या माल उचलणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. या तिघांवर कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.