मुरुडमध्ये इंटरनेटचा स्पीड कमी असल्याने रेशन दुकानदार हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:23 AM2020-11-25T01:23:13+5:302020-11-25T01:23:31+5:30
ई-पास मशीनचा शिधापत्रिकाधारकांना होतोय त्रास
n लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : शासनाने गरजू नागरिकांना दोन वेळच्या अन्नाची सोय व्हावी, या उद्देशाने रेशनकार्डवर स्वस्त दरात दर महिना धान्य ई-पास मशीनद्वारे रास्त भाव धान्य दुकानातून धान्याचे वितरण करण्यात येत असते. सलग दोन दिवस कमी प्रमाणात इंटरनेट मिळत असल्याने एका शिधापत्रिकाधारकाला मशीनवर बोटाचे ठसे घेण्यास पंधरा मिनिटे लागत आहेत. यामुळे धान्य वितरण करण्यात अडचण येत आहे. रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी आलेल्या शिधापत्रिकाधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानांमध्ये ई-पास मशीन लावण्यात आल्या आहेत. यात मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे. परंतु रास्तभाव धान्य दुकानांमधील ई-पास मशीनकरिता नेटवर्क पुरेसे मिळत नसल्याने वारंवार शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात अडथळा निर्माण होत आहे. शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ई-पास मशीनला इंटरनेट सेवा मिळत नसल्याने अनेक शिधापत्रिकाधारकांना रेशन घेण्यास उशीर होत आहे. हीच परिस्थिती तालुक्यातील बहुतांश दुकानांमध्ये आहे. अनेक शिधापत्रिकाधारकांच्या बोटाचे ठसे ई-पास मशीनवर उमटत नाहीत.
उमटत नाहीत बोटाचे ठसे
शासनाकडून ऑनलाइन धान्य वितरणाची राबविण्यात येत असलेली योजना शिधापत्रिकाधारकांच्या फायद्याची असली तरी ई-पास मशीनवर उमटत नसलेले बोटाचे ठसे आणि वारंवार इंटरनेट सेवा मिळत नसल्याने रेशनमालकाबरोबर शिधापत्रिकाधारकांना त्रास सहन लागत आहे.