नेरळ : कर्जत तालुक्यात धान्यांचा अपहार करून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे, अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नेरळ परिसरातील नेरळ खांडा, दहिवली आणि कोल्हारे या रेशनिंग दुकानदारांनी काही रेशनिंग धारकांना धान्य न दिल्याने याबाबत कर्जतच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पुरवठा निरीक्षक यांच्या मार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे.रास्त भाव दुकानदारांनी लाभार्थ्यांसाठी आलेले धान्य नॉमिनीद्वारे काढले आहे, त्यामुळे ते लाभार्थ्यांला मिळू शकले नाही. दुकानदाराने धान्याचा अपहार केला असून या प्रकरणी त्याच्या रास्त भाव दुकानावर तत्काळ कारवाई करून परवाना रद्द करण्यात यावा, असा अहवाल कर्जत तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला आहे.अन्न सुरक्षा योजनेतून गरीब कुटुंबाला, तर निराधार, अपंग, आदिवासी बांधवांना अंत्योदयचा लाभ दिला जातो; परंतु रेशनिंग दुकानदार लाभार्थींना धान्य देत नसल्याचे उघड झाले आहे. नेरळ दहिवली येथील रास्तभाव दुकानदाराने कल्पना रामचंद्र राणे यांचे जून ते सप्टेंबर २०१८ पर्यंतचे धान्य नॉमिमीद्वारे वितरित केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना तीन महिन्यांचा लाभ मिळालेला नाही, तसेच कोल्हारे येथील दुकानदाराने राजू हरिचंद्र बार्शी याचेही रेशन कार्डवरील १८ किलो तांदूळ व १२ किलो गहू सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ मध्ये नॉमिनीद्वारे वितरित केले आहे, तसेच डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ मध्ये कार्डधारकांनी स्वत: घेतल्याचे दिसून येते; परंतु सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत रजिस्टरमध्ये धान्य वितरणाची नोंद नाही.नेरळमधील रास्त भाव दुकान ५ मध्ये पांडुरंग बैकर यांना १८ किलो तांदूळ व १२ किलो गहू हे मे २०१८ पासून जानेवारी २०१९ पर्यंत दिल्याची नोंद आरसी बुकमध्ये दिसत असली तरी विक्री रजिस्टर तपासले असता, नोंद आढळली नाही. तसेच कार्डधारकांच्या कार्डावरही याची नोंद नाही. नेरळ परिसरातील नेरळ, दहिवली आणि कोल्हारे रेशनिंग दुकानदारांनी अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या रास्त भाव दुकानावर तत्काळ कारवाई करून परवाना रद्द कण्यात यावा, असा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला आहे.>धान्यांचा अपहार करून गोरगरीब जनतेला लुटण्याचा प्रकार नेरळ परिसरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ परिसरातील नेरळ खांडा, दहिवली आणि कोल्हारे या रेशनिंग दुकानदारांनी अपहार केल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यानुसार कर्जत तहसीलदार कार्यालयाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अहवाल सादर केला आहे. संबंधित रेशनिंग दुकानांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याची गरज आहे.- विजय हजारे, सामाजिक कार्यकर्ते, कोल्हारे
रेशनिंग दुकानदारांचे परवाने होणार रद्द?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 12:05 AM