नेरळ : कर्जत तालुक्यात रेशनिंग दुकानदारांकडून मनमानी कारभार करून ग्राहकांना वेठीस धरले जाते. तक्रार करायला गेल्यास रोजगार बुडत असल्याने अनेक जण तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांचे चांगलेच फावते. मात्र आता जिल्हा पुरवठा अधिका-यांनी याची दखल घेऊन घोटाळेबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.नेरळ परिसरात सुमारे ९-१० शासनमान्य रास्त भाव म्हणजेच रेशन दुकाने आहेत. यापैकी बहुतेक रेशन दुकानांमध्ये ग्राहकांना रेशनच मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. मात्र रास्त भाव दुकानांचा ग्राहक हा मोलमजुरी, रोजंदारीवर काम करणारा असल्याने तक्रारी करायच्या म्हटले तरी रोजंदारी बुडवावी लागते. रोजगार बुडाला तर खाणार काय? असे असल्यामुळे कुणी तक्रार करायला पुढे येत नाही.नेरळ दहिवली वरेडी येथे रास्त भाव दुकानात कल्पना भालचंद्र राणे यांचे अंत्योदय योजनेत खाते होते. या योजनेच्या माध्यमातून येणारे धान्य राणे यांना फक्त १५ किलोच वितरित करण्यात येत होते. रास्त भाव दुकानदारास विचारणा केल्यावर, एवढेच धान्य मिळेल असे सांगण्यात आले. याबाबत त्यांचे नातेवाईक विजय हजारे यांनी आॅनलाइन तपासणी केली असता ३५ किलो धान्य राणे यांच्या नावाने नियमित वितरीत करण्याच्या नोंदी आढळल्या. त्यामुळे ३० जानेवारी २०१९ मध्ये हजारे यांनी कर्जत तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली. राणे यांच्याप्रमाणेच खांडा येथील पांडुरंग बैकर यांनी नेरळ रास्त भाव दुकान नं.५ तर कोल्हारे येथील राजू बार्शी यांची कोल्हारे रास्त भाव दुकानातील धान्य वितरणाबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे हजारे यांनी तक्रारीचा पाठपुरवठा सुरु ठेवला.जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी चौकशी केली असता नेरळ परिसरातील ३ रेशन दुकानांत काळाबाजार झाल्याचे उघड झाले. त्यानुसार नेरळ खांडा येथील धाऊ उघडा यांचे रास्त भाव दुकान नं.५ व कोल्हारे येथील वसंत शिंदे यांचे रास्त भाव दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच परवण्यापोटी शासनाकडे असलेली अनामत रक्कम जप्त करून नवीन अनामत रक्कम १०० % भरण्यास सांगून चौकशी अहवालातील धान्याच्या अपहाराची एकूण रक्कम वसुलीचे आदेश बोडके यांनी दिले आहेत. दोन्ही रास्त भाव दुकानातील ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जवळच्या दुसºया दुकानात त्यांना विलीन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तर दहिवली तर्फे वरेडी येथील रेशन दुकानदार करसनदास कोठारी यांच्या चौकशी अहवालात माध्यम स्वरूपाचा दोष असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्या दुकानाची अनामत रक्कम जप्त करून नव्याने १००% अनामत रक्कम भरून अपहार केलेली रक्कम वसूल करून परत धान्याचा अपहार होणार नाही अशी ताकीद देण्यात आली आहे. या कारवार्ईमुळे रेशनचा काळाबाजार करणाºयांचे धाबे दणाणले आहे.रेशन दुकानांत नॉमिनी पर्यायाचा वापर करून गरिबांच्या तोंडचे धान्य पळवून काळाबाजार सुरु आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व तालुक्यातील अधिका-यांनी यापुढेही कारवाई सुरू ठेवल्यास धान्याचा काळाबाजार करणाºयांवर अंकुश ठेवता येईल. ज्या दुकानदारांचे परवाने रद्द झाले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.- विजय हजारे,सामाजिक कार्यकर्ते, कोल्हारे
नेरळमध्ये रेशनचा काळाबाजार; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 1:20 AM