रायगड जिल्ह्याच्या विकासाला न्याय देऊ, रवींद्र चव्हाण यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:23 AM2018-02-15T03:23:51+5:302018-02-15T03:24:00+5:30
पालकमंत्री म्हणून काम करण्यासाठी आपल्याला कमी कालावधी मिळाला असला, तरी या कमी कालावधीत पूर्ण होणारी जास्तीत जास्त कामे मार्गी लावून रायगडला न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
महाड : पालकमंत्री म्हणून काम करण्यासाठी आपल्याला कमी कालावधी मिळाला असला, तरी या कमी कालावधीत पूर्ण होणारी जास्तीत जास्त कामे मार्गी लावून रायगडला न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चव्हाण यांनी आपला रायगड जिल्ह्याचा दौरा महाड येथून सुरू केला. मंगळवारी सायंकाळी महाड येथे आगमन झाल्यानंतर, त्यांनी महाशिवरात्रीचे आणि छबिनोत्सवाचे औचित्य साधून ग्रामदैवत विरेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेऊन, पत्रकारांकडून महाडसह जिल्ह्याच्या समस्या जाणून घेतल्या.
महाड तालुक्यातील रखडलेला काळ कुंभे जलविद्युत प्रकल्प, निधीअभावी तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, महाड हे तालुक्याचे ठिकाण असूनही शहरात सर्वदूर विखुरलेल्या शासकीय कार्यालयांचे एका प्रशासकीय इमारतीमध्ये स्थालांतर, महाड ट्रॉमा केअर सेंटर कार्यक्षम करण्यासाठी पुरेशा वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती, महाड औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार नेते गं. द. आंबेकर यांचे यथोचित स्मारक, याच औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार कल्याण केंद्राची स्थापना अशा विविध सूचना पत्रकारांनी या संवादादरम्यान केल्या. त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिले. या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, भाजपा महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी चव्हाण यांनी विरेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. विरेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप हेदेखील या वेळेस उपस्थित होते.
विरेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणाचा १९ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव रेंगाळला असल्याची बाब पंच कमिटीच्या वतीने चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या संदर्भात आपण संबंधितांकडून माहिती घेऊन हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.
शिवसेनेबरोबर युती होणार का? असा राजकीय प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर मात्र थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.