आरसीएफ स्फोट प्रकरण; जखमी साजिदचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या 4 वर
By राजेश भोस्तेकर | Published: October 20, 2022 05:49 PM2022-10-20T17:49:08+5:302022-10-20T17:52:04+5:30
आरसीएफमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. यासाठी उच्च स्तरीय तज्ञ सदस्याची चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. या समिती मार्फत दुर्घटनेची चौकशी केल्यानंतर अहवाल सादर केला जाणार आहे.
अलिबाग - अलिबाग तालुक्यातील थळ येथील खत निर्मित आरसीएफ कंपनीत जीटीजी या विभागात एसी रुमच्या कॉम्प्रेसर चे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन तीन कर्मचारी मयत झाले असून तीन जण स्फोटात भाजल्याने गंभीर जखमी झाले असल्याची घटना बुधवारी १९ ऑक्टोंबर रोजी घडली होती. साहिद मोहम्मद सिद्दीकी २३ वर्ष, जितेंद्र शेळके, वय ३४, अतींदर मनोज हे तिघे जखमी झाले होते. याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. यापैकी साहिद मोहम्मद सिद्दीकी याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबाबत आरसीएफ प्रशासनाकडून उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी केली जाणार आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे.
आरसीएफ कंपनीत मेसर्स ए ग्लोबल या ठेकेदार कंपनी मार्फत बाष्प निर्मित सयत्रासाठी नवीन वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम जीटीजी विभागात सुरू होते. ठेकेदार कंपनीचे पाच तर एक मॅनेजमेंट कर्मचारी असे सहा जण सकाळ पासून काम करीत होते. सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. यामध्ये अंकित शर्मा (२७), फैजून जुनेद शेख (३२), दिलशाद आस्लाम इदनिकी (२९) हे मयत झाले. साहिद मोहम्मद सिद्दीकी, जितेंद्र शेळके, अतींदर मनोज हे तिघे जखमी झाले होते. जखमींना तातडीने आर सी एफ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले होते.
साहिद मोहम्मद सिद्दीकी याच्यावर ऐरोली फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार दरम्यान साहिद हे मृत झाले आहेत. आर सी एफ प्रशासनाकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबास प्रत्येकी पाच लाख तर जखमींच्या उपचाराचा खर्च आणि प्रत्येकी तीन लाख रुपये तातडीची मदत सपूर्दा करण्यात आलेली आहे. या दुर्घटनेबाबत पोलिसांनी अकस्मात अपघात मृत्यू ची नोंद केलेली आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
दुर्घटनेची उच्च स्तरीय चौकशी
आरसीएफमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. यासाठी उच्च स्तरीय तज्ञ सदस्याची चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. या समिती मार्फत दुर्घटनेची चौकशी केल्यानंतर अहवाल सादर केला जाणार आहे. मुख्य महा व्यवस्थापक (कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याचे श्रीनिवास कुळकर्णी मुख्य महाव्यवस्थापक, प्रशासन व मानव संपदा यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.