अलिबाग : राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प इतर राज्यांत जात आहेत. अलिबाग तालुक्यात आरसीएफ विस्तारित प्रकल्प आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या दोन्ही प्रकल्पांबाबत जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आरसीएफ कंपनीच्या नव्या प्रकल्पाची जनसुनावणी विशिष्ट कालावधीत घेतली गेली नाही, तर हा प्रकल्प इतर राज्यात जाण्याची शक्यता खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी व्यक्त केली.
अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात तटकरे यांची पत्रकार परिषद झाली. जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, माजी राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक यावेळी उपस्थित होते. आरसीएफ कंपनीमध्ये ९१२ कोटी गुंतवणूक असलेला नवा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामार्फत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाबाबत पर्यावरण विषयक जनसुनावणी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली ठेवली होती. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार, असे कारण देऊन जिल्हाधिकारी यांनी जनसुनावणी रद्द केली. मात्र विशिष्ट कालावधीत ही जनसुनावणी झाली नाही, तर येणारा प्रकल्प रद्द होईल, असे आरसीएफचे सीएमडी यांनी सांगितले असल्याची माहिती तटकरे यांनी यावेळी दिली. त्यामुळे हा प्रकल्प इतर राज्यात असणाऱ्या आरसीएफ कंपनीत जाण्याची दाट शक्यता त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्नही प्रलंबित आहे. तो सुटणेही महत्त्वाचे आहे. मात्र जर जनसुनावणी विशिष्ट कालावधीत घेतली गेली नाही, तर प्रकल्पही नाही आणि नोकऱ्याही नाहीत, अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जनसुनावणी घेऊन अहवाल केंद्राकडे तातडीने पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडेही दुर्लक्ष- एक तपानंतर जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन पहिली तुकडीही शिक्षण घेऊ लागली आहे. - महाविकास आघाडी सरकारने साडेचारशे कोटी निधीही मंजूर करून प्रशासनाकडे दिला आहे. - उसर येथे कामही सुरू झाले होते. - मात्र, ग्रामस्थांचा वहिवाट रस्ता असल्याचे कारण देत काम बंद ठेवले आहे. - ग्रामस्थांना पर्यायी किंवा त्यातून रस्ता द्यावा. - पण, काम बंद करणे चुकीचे आहे. - एमआयडीसीने महाविद्यालयासाठी मोफत जमीन दिली आहे. - या वैद्यकीय महाविद्यालयामुळे परिसराचा विकास होणार आहे. - तसेच उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहेत. - असे असताना जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी केला.