RDCC बँकेवर शेकापचा लाल बावटा, I.N.D.I.A च्या विजयाची मुहूर्तमेढ रायगडात!
By राजेश भोस्तेकर | Published: September 17, 2023 01:47 PM2023-09-17T13:47:35+5:302023-09-17T13:49:14+5:30
शेकापचे आमदार जयंत पाटील यांची विजयानंतर प्रतिक्रिया
राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: विरोधकांनी मोर्चे बांधणी करूनही आमचा दणदणीत विजय झाला आहे. महा विकास आघाडी ही इंडिया आघाडीत विलीन झाली आहे. आम्हीही इंडिया आघाडीचे घटक असून ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक ही एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मिळालेला विजय हा इंडियाचा पहिला विजय असून त्याची मुहूर्तमेढ रायगडमध्ये रोवली गेली आहे. जिल्हा बँकेत राजकारण न आणता तीस वर्ष सहकार्याच्या सोबतीने काम केल्याने हा विजय त्याचा असल्याचे मत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी विजयानंतर व्यक्त केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २०२३-२४ ते २०२८-२९ या पाच वर्षासाठी २१ संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शेकाप, काँग्रेस, ठाकरे गट आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली होती. २१ संचालक पैकी १८ संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी शनिवारी १६ सप्टेंबर रोजी चार केंद्रात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. रविवारी अलिबाग ऍड दत्ता पाटील लॉ महाविद्यालयात मतमोजणी पार पडली.
इतर शेती सहकारी संस्था मतदार संघातून इंडिया आघाडी तर्फे आमदार बँकेचे माजी चेअरमन, आमदार जयंत पाटील तर भाजप तर्फे संतोष देशमुख यांच्यात लढत होती. महिला राखीव मतदार संघातून आघाडीच्या प्रिता चौलकर, मधुरा मलुटे तर भाजप तर्फे संगीता देशमुख, मनिषा पाठारे यांच्यात लढत आहे. आमदार जयंत पाटील हे ९४ मते घेऊन विजयी झाले तर विरोधक संतोष देशमुख यांना फक्त ५ मतावर समाधान मानावे लागले. प्रीती चौलकर याना ७०४ तर विरोधक संगीता देशमुख यांना २१ मते पडली. मधुरा मलुटे याना ६९९ तर मनिषा पाठारे याना १७ मते पडली. तीनही जागेवर इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आले.
आर डी सी सी बँकेच्या माध्यमातून इंडिया आघाडीचा देशातील पहिलाच विजय झाला आहे. विजयी उमेदवारांची मिरवणूक अलिबाग शहरातून वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी शेकापचा लाल झेंडा पुन्हा एकदा फडकताना पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे हनुमंत जगताप हे सुद्धा या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहे. यावेळी निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
इंडिया आघाडीची पंधरा दिवसांपूर्वीच बैठक झाली. या बैठकीत ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे इंडियाच्या पहिल्याच विजयाची मुहूर्तमेढ ही रायगडात रोवली गेली आहे. बँकेची वाटचाल पाच हजार कोटींवर गेली आहे. पुढील काळात एकही कर्ज प्रकरण थकीत राहणार नाही असा प्रयत्न राहणार आहे. बँकेचा ओघ ७०० कोटी आहे. बँकेची १११ प्रकरणे थकीत आहेत. थकीत प्रकरणे मार्च अखेर पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. प्रशासन मध्ये आधुनिकीकरण करण्याचे काम केले आहे. कमीत कमी मनुष्यबळ पण काम अधिक हे धोरण अवलंबले आहे.
-आमदार जयंत पाटील