जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:20 PM2019-08-25T23:20:00+5:302019-08-25T23:20:22+5:30
डॉक्टर वेळेत उपलब्ध नसतात : रुग्णांचे हाल; पनवेल, नवी मुंबईत धाव
अलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये सर्जिकल वॉर्डमध्ये आॅर्थोपेडिक उपचारासाठी, सिटीस्कॅनसाठी डॉक्टर नाही. त्यामुळे रुग्णांच्या तपासण्या वेळेत होत नसल्याने आरोग्याबाबत हेळसांड सुरू आहे. याकडे रुग्णालय प्रशासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर वर्ग एकचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे पद धरून १९ पदे मंजूर आहेत. वर्ग दोनची ३० पदे मंजूर, गट ब चे एक पद अशी एकूण ५० पदे आहेत. त्यापैकी ३५ पदे भरलेली आहेत. पैकी सहा अधिकारी कायम गैरहजर असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सुमारे २० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. म्हणजेच ४९ डॉक्टर कार्यरत असतानाही रुग्ण डॉक्टर नसल्याची सातत्याने ओरड करतात. रुग्णालय प्रशासनाकडे ५० डॉक्टरांचा ताफा आहे, तर तो रुग्णांच्या सेवेसाठी पुढे का येत नाही, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी उपस्थित केला.
सरकारी सेवेतील डॉक्टरांना महिन्याला सरासरी एक लाख रुपये वेतन दिले जाते. तसेच प्रत्येक रुग्णामागे त्यांना विविध योजनांमधून मिळणारे भत्ते धरून काही डॉक्टर दोन ते पाच लाख रुपयांच्यावर महिन्याला वेतन घेत आहेत. परंतु रुग्णांना डॉक्टर वेळेत उपलब्धच होत नसल्याचा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहिला आहे.
काही दिवसांपूर्वी विविध उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होते. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एकही डॉक्टर वेळेवर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रुग्णांसह रुग्णाच्या नातेवाइकांचे चांगलेच हाल झाले. त्यातील काहींनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना योग्य प्रतिसाद न आल्याने रुग्णालयामध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला होता. मात्र, आताही त्या परिस्थितीमध्ये काहीच फरक पडलेला नाही.
रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा योग्य ताळमेळ नाही. त्यामुळे रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नाही. कामचुकारपणा, उपचारासाठी टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरांना बडतर्फ करूनही काहीच उपयोग होत नाही.
मुळातच रायगड जिल्ह्यामध्ये येण्यासाठी बºयाच डॉक्टरांची नकारघंटाच असते. त्यामुळे आहे त्या डॉक्टरांशिवाय पर्यायच राहत नाही. त्यामुळे त्यांची मनमानी वाढत
आहे.
च्बिघडलेली आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकारमध्ये असलेले मंत्री यांचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. एखादा लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची पाहणी केल्यावर काही दिवस सर्व सुरळीत होते. मात्र, अल्पावधीतच परिस्थिती जैसे थे होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
- तीन दिवसांपूर्वी जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होतो. चार-पाच तास झाले तरी डॉक्टर पोहोचलेच नाहीत. सर्व रुग्णांच्या नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने काही कालावधीनंतर डॉक्टर आले.
- - अब्दुल मुल्ला, रुग्ण