गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील कोंढेपंचतन येथील वृद्ध महिलांकडून पिण्याच्या पाण्यासाठी विनवणी केली जात होती. एप्रिलच्या मध्यातच पाणीटंचाई भेडसावू लागल्याने कोंढेपंचतन गवळवाडी येथे घोटभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली. या पाणीसंकटाचे वृत्त‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेऊन येथील पाणीसमस्या दूर करण्यात आली.
श्रीवर्धन तालुक्यातील मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोर्लीपंचतन ग्रुपग्रामपंचायतमध्ये कोंढेपंचतन या गावाचा समावेश आहे. ३०० हून अधिक लोकसंख्या असणाºया गावात पाणीटंचाई समस्या दरवर्षी कायमची बनली होती. विशेष म्हणजे, याच गावाच्या नावाने कोंढे धरण उशाला असून येथील ग्रामस्थांचा पाण्याविना घसा कोरडा होता. एका बाजूला प्रशासनापुढे कोरोना संक्रमणाच संकट उभे असताना दुसºया बाजूला तालुक्यातील या भागात पाणीटंचाईचे संकट होते. याची माहिती घेऊन पंचायत समितीचे अधिकारी समस्या दूर करण्यासाठी सरसावले. यामध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी किशोर नागे, पाणीविभाग कर्मचारी राजेश कासरूंग, अभियंता बाळू बाक्कर, ग्रामसेवक दिनेश रहाटे व ग्रामपंचायत सदस्य यांनी वेळेत कोंढेपंचतन गवळवाडी येथे भेट दिली.उन्हाळ्यात श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी प्रशासनाकडून अंदाजे एप्रिलमध्ये पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात येतो व टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी दिले जाते. मात्र, या वेळी कोरोनाच्या संकटामुळे तालुक्यातील अनेक कामे रखडली होती. मागणी होत असताना पाणी मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता. कोरोनाचे संकट सर्वत्र पसरले असून संचारबंदीत कामधंदे व मजुरीही बंद आहे. एकीकडे उपासमार तर दुसरीकडे पाण्याची चणचण अशा दुहेरी संकटाचा सामना कोंढेपंचतन ग्रामस्थ करीत असताना पाणी लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी स्थानिकांनी केली. या समस्येवरचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करताच येथील दोन मैलावर नूतन बांधकाम होत असलेल्या विहिरीतील पाणी पंपाद्वारे देण्यात आले.