अलिबाग : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक पारदर्शी होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा परिषदेसाठी एकूण ५९ गट तर पंचायत समितीसाठी ११८ गण आहेत. १ हजार ९४० मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी उगले म्हणाल्या की, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी साठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. चेकपोस्ट, भरारी पथक, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम तयार करण्यात आल्या आहेत. चेकपोस्टवर या टीममार्फत तपासणी करण्यात येणार आहे. पेडन्यूजसंदर्भातील तक्र ारी तसेच जाहिरात प्रसारण परवानगी देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक खिडकी योजनेंतर्गत परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी एकूण पाच निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक काळात परवाना असलेली शस्त्रे जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी तेली-उगले व जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची द्विसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.जिल्ह्यातील निवडणुका शांततेत व निर्भयपणे पार पडाव्यात यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कोठेही कोणत्याही स्वरुपाचा अनुचित प्रकार घडल्यास २० मिनिटांच्या आत पोलीस पोहोचतील असे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले. पोलिसांनी सहकार्य करण्याकरिता ४५० होमगार्डची मदत घेण्यात येणार आहे. राज्य राखीव दलाची एक कंपनी बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आली आहे. रायगड पोलीस क्षेत्रांत ९५ पोलीस झोन तयार करण्यात आले आहेत. एका झोनमधील सर्व मतदान केंद्रांची तपासणी एक ते दीड तासात वरिष्ठ पोलीस अधिकारी करतील असेही नियोजन केले आहे. पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एकूण तीस जणांच्या समावेशाची चार ‘सत्वर प्रतिसाद पथके’तयार करण्यात आली असून कुठलीही अनुचित घटना घडल्यास केवळ ३० मिनिटांत घटनास्थळी पोहचून ही पथके पुढील कार्यवाही करतील असे पारसकर यांनी सांगितले. मागील २००७ पासूनच्या निवडणुकांचा आढावा घेऊन गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींना नोटिसा देऊन तसेच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रे घेतली आहे. निवडणूक काळात २२ गुंडांना तडीपार करण्याची कार्यवाही करणे प्रस्तावित असल्याचे सांगितले.या बैठकीच्या वेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र दंडाळे, तहसीलदार (निवडणूक) अजित नैराळे आदींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
By admin | Published: February 14, 2017 4:54 AM