आपत्ती निवारणासाठी दरडप्रवण गावे सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:44 AM2018-06-20T02:44:01+5:302018-06-20T02:44:01+5:30
नैसर्गिक आपत्ती आल्यावर, ग्रामस्थांनी आपत्ती निवारणात्मक उपाययोजना आपापल्या स्तरावर हाती घेतल्यास जीवितहानी रोखण्यात अथवा कमी होण्यात यश येते
- जयंत धुळप
अलिबाग : नैसर्गिक आपत्ती आल्यावर, ग्रामस्थांनी आपत्ती निवारणात्मक उपाययोजना आपापल्या स्तरावर हाती घेतल्यास जीवितहानी रोखण्यात अथवा कमी होण्यात यश येते, त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील दरडप्रणव गावांतील ग्रामस्थ, तसेच सामाजिक संस्थांना आपत्ती निवारण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम यंदा प्रथमच रायगड जिल्ह्यात हाती घेण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील दरडप्रणव पोलादपूर, महाड, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, पनवेल, खालापूर आणि कर्जत या नऊ तालुक्यांतील गावांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पोलादपूर तालुक्यात १५, महाड तालुक्यात ४९, तळा व माणगाव तालुक्यांत १४, रोहा व सुधागड तालुक्यांत १६ आणि पनवेल, कर्जत व खालापूर तालुक्यांत नऊ अशी १०३ गावे दरडप्रणव असल्याचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणेने निश्चित केले.
आपत्तीअंती स्थानिक समाज घटकांच्या माध्यमातूनच आपत्ती निवारण उपाययोजना कार्यान्वित करणे, या सूत्रानुसार या नऊ तालुक्यांतील दरडप्रणव गावांतील सरपंच, पोलीसपाटील, तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षक आदी विविध प्रमुख समाज घटकांकरिता प्रशिक्षण, रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या माध्यमातून गेला महिनाभर करण्यात आले. प्रशिक्षण शिबिरांत पोलादपूर येथे ७५, महाड येथे २४५, माणगाव येथे ७०, रोहा येथे ८० आणि पनवेल येथे ४५ असे एकूण ५१५ विविध प्रमुख समाज घटक सहभागी झाले होते, असे पाठक यांनी पुढे सांगितले. प्रशिक्षणानंतर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने शिफारस केल्यानुसार रचनात्मक, अरचनात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला असून, या प्रशिक्षणामुळे ग्रामस्थांना नवा आत्मविश्वास गवसला आहे.
दरडी कोसळण्याच्या नैसर्गिक आपत्तीना आळा घालण्याकरिता भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात केलेल्या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या अभ्यासानंतर ८४ गावे दरडप्रवण निश्चित केली होती. मात्र, यंदा केलेल्या सर्वेक्षणांती त्यामध्ये १९ गावांची वाढ होऊन आता दरडप्रणव गावांची संख्या १०३ झाली आहे. बेसुमार जंगलतोड, उत्खनन, डोंगराळ भागात झालेली बांधकामे यांच्यामुळे या दरडप्रवण गावांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाचा आहे.
>दरड कोसळण्यास महत्त्वाची कारणे
कमी वेळेत ५०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक
दरडप्रवण गावांमधील डोंगर उताराकडील डोंगर कापण्याचे प्रकार
डोंगर उतारावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसणे
झाडांची कत्तल
ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग
नऊ तालुक्यांतील गावांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण
सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षक यांना प्रशिक्षण
दरडप्रणव गावांच्या संख्येत १९ गावांची वाढ