अलिबाग : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम हा गणेशोत्सवानंतर रंगणार आहे. मात्र, त्याआधीच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कलह रंगला आहे. विद्यमान आमदारांविरोधातच इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीत कर्जत, श्रीवर्धन, उरण व महाड या मतदारसंघांमध्ये बंडखोरी अटळ दिसत आहे.
रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. अलिबाग, महाड, कर्जत हे मतदारसंघ शिंदेसेनेकडे तर पेण, पनवेल हे भाजपकडे आहेत. उरणमध्ये अपक्ष आमदार आहेत, श्रीवर्धन मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे. या सातही मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत. सध्या विद्यमान आमदाराला मतदारसंघ सोडला जाईल, असे महायुतीचे सूत्र दिसते. महायुतीतच अनेक इच्छुक आहेत.
मविआत बिघाडी? - उरण मतदारसंघात मविआचे उद्धवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शेकापचे राजेंद्र पाटील यांनी तयारी सुरू केली. येथे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. - महाड मतदारसंघात ठाकरे सेनेच्या स्नेहलता जगताप इच्छुक आहेत, काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा केला. पनवेल आघाडीतील काँग्रेस, शेकाप यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
अलिबागमध्ये शेकाप-काँग्रेसमध्ये रस्सीखेच- अलिबाग मतदारसंघात शिंदेसेनेचे महेंद्र दळवी हे आमदार आहेत. मात्र, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. ते मतपेरणी करत आहेत. - नुकतेच अलिबागमधील अधिवेशनात भाजपने विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकले. तर, आघाडीमध्येही शेकाप आणि काँग्रेस यांच्यात उमेदवारीवरून धुसफूस सुरू आहे. - शेकापकडून चित्रलेखा पाटील, माजी आमदार पंडित पाटील, ॲड. आस्वाद पाटील हे उमेदवार तयारीत आहेत. काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. प्रवीण ठाकूर हेसुद्धा इच्छुक आहेत.
थोरवे-घारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप - कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे महेंद्र थोरवे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी थेट प्रचारच सुरू केला आहे. - घारे आणि थोरवे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. विधानसभा निवडणूक लढायची आहे. विरोधकांनी वीट मारली तर दगडाने उत्तर दिले जाईल, असा थेट इशाराच घारे त्यांनी दिला आहे.