- आविष्कार देसाईअलिबाग : उमेदवारीची आस लावून बसलेल्यांना विधानसभेचे तिकीट पक्के न झाल्याने त्यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. सध्या उरण आणि पेण याच मतदारसंघामध्ये या ग्रहणाची छाया पडली असली, तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ती अन्य मतदारसंघात अधिकच गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.निवडणुकीच्या काही महिने आधी भाजपने आणि शिवसेनेने आपापल्या पक्षामध्ये बड्या राजकीय नेत्यांची भरती करून घेतली होती. त्यामुळे अन्य पक्षातून आलेल्यांसाठी भाजपसह शिवसेनेने रेडकार्पेट टाकले होते. अन्य पक्षातून आलेल्यांना निवडणुकीत संधी दिली जात असल्याने दोन्ही पक्षांतील संभाव्य उमेदवार नाराज झाले. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना आणि भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर केले नाहीत, असे सांगितले गेले. मात्र, बंडाचे निशाण हे फडकवले गेलेच. याचा प्रत्यय महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात आला तीच परिस्थीत रायगड जिल्ह्यातही दिसून येते.अलिबाग, श्रीवर्धन, महाड, उरण आणि कर्जत या जागा शिवसेनेच्या तर पनवेल आणि पेणच्या जागेवर भाजप आपले उमेदवार उतरवणार असे सूत्र होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होताच प्रथम उरण मतदारसंघामध्ये भाजपचे महेश बालदी यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकवले आहे, त्यामुळे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोहर भोईर यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत. महेश बालदी यांनी सुरुवातीपासूनच भाजपची उमेदवारी आपल्याच मिळणार अशा पद्धतीने कामाला सुरुवात केली होती. भाजपनेही त्यांना, कामाला लागा, असे सांगितले होते.उरण मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या विरोधात महेश बालदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्याला प्रतिउत्तर म्हणून शिवसनेने पेण विधानसभा मतदारसंघामध्ये नरेश गावंड यांना मैदानात उतरवले आहे. पेणमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री रवींद्र पाटील यांना एक प्रकारे आव्हान दिल्याचे बोलले जाते. निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याबाबत शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सांगितल्याचे नरेश गावंड यांनी स्पष्ट केले. मातोश्रीवरून आलेल्या आदेशाचे पालन करा, असे जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी आणि संपर्कप्रमुख विलास टावरी यांनीही तशाच सूचना दिल्या असल्याचे नरेश गावंड यांनी बुधवारी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अॅड. महेश मोहिते हेसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्याही अडचणींत वाढ होणार आहे.दबावतंत्राच्या वापराची चर्चाअशीच परिस्थिती राहिल्यास श्रीवर्धन, महाड, कर्जत, पनवेल या ठिकाणीसुद्धा युतीमधीलच उमेदवार उभे राहून आव्हान देऊ शकतात. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ४ आॅक्टोबर आहे.त्यामुळे पुढील दोन दिवस कोणकोणत्या मतदारसंघात बंडखोरी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करून दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कोणत्या सेटलमेंटवर बंडखोरी करणारे शांत बसणार हे लवकरच स्पष्ट होईल.
रायगड जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 3:11 AM