खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल; धाटाव एमआयडीसीतील उद्योगांवरही परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:50 AM2018-08-04T03:50:51+5:302018-08-04T03:51:00+5:30
औद्योगिक वसाहत असलेल्या धाटावमधील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
धाटाव : औद्योगिक वसाहत असलेल्या धाटावमधील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
शाळा सुरू होऊन जवळपास महिना-दीड महिना झाला आहे. या काळात दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वीजपुरवठा खंडित असल्याने विद्यार्थी, तसेच पालक त्रस्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच कामगार वर्गाबरोबर लहान-मोठ्या व्यावसायिकांनाही खंडित वीजपुरवठ्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
रोह्यात धाटाव विभागातील किल्ला, वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, रोठखुर्द, उडदवणे, मालसई यासारख्या ग्रामीण भागात वारंवार तर काही ठिकाणी तब्बल चार ते पाच तास वीज गायब होत आहे. याबाबत वीज वितरणकडे विचारणा केली असता, कोणतेही ठोस कारण दिले जात नाही. केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
या गंभीर समस्येबाबत धाटाव येथील सहायक अभियंता कार्यालय तर रोहा कार्यकारी अभियंता घायतडक यांना ग्रामस्थांच्या वतीने वीजपुरवठा सुरळीत व्हावा याबाबत निवेदन देण्यात आले.
महिनाभरात वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच विजेचा दाब कमी जास्त होत असल्याने इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरु स्त होणे, सहायक अभियंता धाटाव कार्यालयातील दूरध्वनी जाणीवपूर्वक बंद ठेवणे, गंजलेले पोल बदलणे, वीज बिल अंतिम दिनांकापूर्वी देणे, वायरमनच्या दैनंदिन ड्युटीबाबतीत शेड्युल पत्रक लावणे, धाटाव येथे सहायक अभियंता पद रिक्त असल्याच्याही तक्र ारी या वेळी मांडण्यात आल्या.
तालुक्यात चार सहायक अभियंता पद रिक्त असल्याने उर्वरित अभियंत्यांना अतिरिक्त चार्ज देण्यात आले आहे. रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठांना विनंती केली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. शासनाच्या दीनदयाळ योजनेअंतर्गत पोल बदलणे व वाढीव पोल मागणी प्रस्तावित आहे. मात्र, कंत्राटदार नेमूनही काम होत नसल्याचे लक्षात आल्यावर आठवडाभरात उपविभागीय अभियंता वानखेडे यांच्यामार्फत सर्व्हे करून अत्यावश्यक पोल तातडीने बदलण्यात येतील, असे सांगण्यात आले. याशिवाय एकच तक्र ार दूरध्वनी क्र मांक उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकमधील विजेचा लपंडाव न थांबविल्यास आंदोलन
वावोशी : चौक गावात अनेक दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. वितरण विभागाने विजेचा खेळखंडोबा त्वरित न थांबवल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चौक गावचे माजी उपसरपंच गणेश कदम यांनी दिला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या चौक गावात अनेक दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा बंद होत असल्याने गावात चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने छोट्या-मोठ्या उद्योगांवरही परिणाम होऊ लागला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.