एसटीअभावी विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2015 11:31 PM2015-07-07T23:31:46+5:302015-07-07T23:31:46+5:30
सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणाकरिता प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. वाढणारी लोकसंख्या व शिक्षणासाठी बाहेर पडणारे मुले व मुली यांच्या
पाली : सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणाकरिता प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. वाढणारी लोकसंख्या व शिक्षणासाठी बाहेर पडणारे मुले व मुली यांच्या संख्येत अनेक पटींनी वाढ झाली असताना गेल्या अनेक वर्षांपासून एसटी बसेसच्या फेऱ्यांची संख्या मात्र स्थिर आहे. एकीकडे प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणवून घेणाऱ्या महामंडळाला सुधागड तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्येच्या प्रमाणात किती एसटी बसेस असाव्यात याचे गणित सोडविता आले नाही.
जून महिन्यात शाळा सुरू होते तेव्हा विद्यार्थ्यांच्या पुढे पासाची पहिली समस्या उभी राहते. पाली वाहतूक नियंत्रकाने गाड्यांचे वेळापत्रक व टिपणी हे काम करायचे आणि पासेसचेही काम करायचे. पाली येथे जवळपास तीन साडेतीन हजार पासेसची संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पासेसला सर्व नोंदी करण्यासाठी तीन ते चार मिनिटे वेळ लागतो. अशावेळी विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांना शाळा बुडवून स्टँडवर उभे राहावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी महामंडळाकडून अतिरिक्त कर्मचारी दिला जात नाही. अशी स्थिती स्वत: महामंडळाने करुन घेऊन वेळकाढूपणा करण्याचे चित्र दिसत आहे. पाली ते नांदगाव, पाली ते नागोठणे आणि पाली ते खोपोली या तिन्ही मार्गांवर सकाळच्या वेळेत येणाऱ्या दोनच बसेस आहेत. या एसटीमधून प्रवास करणारे प्रवासी व विद्यार्थी यांची संख्या ही १०० ते १२० पर्यंत असते.
जांभूळपाडा, परळी, पेडलीकरिता तसेच शिहू, बेणसे, नागोठणे या मार्गांवर बसेसची संख्या वाढवावी व महाविद्यालयाच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळा लक्षात घेऊन ही सेवा विद्यार्थ्यांसाठी पुरवावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता सहकार्य करावे, अशी विनंती वजा मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)