घरकूल योजनेतील लाभार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:24 AM2019-11-22T00:24:42+5:302019-11-22T00:24:47+5:30
आवास दिन साजरा; माणगाव पंचायत समितीचा गृहप्रवेशाचा आगळा उपक्रम
माणगाव : आवासदिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील माणगाव पंचायत समितीच्या माध्यमातून माणगाव पंचायत समितीमध्ये विळे, निजामपूर, साई आणि गांगवली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील घरकूल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ज्या घरकुलाचे काम परिपूर्ण झाले त्या लाभार्थ्यांच्या घरकुलावर गुढी उभारून आगळ्या वेगळ्या पद्धतीने गृहप्रवेश केला.
भारतीय राज्यघटनेच्या संविधानिक तरतुदीची अंमलबजावणी केली. शासनाच्या नवसंकल्पनेनुसार सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे हे शासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सन २०१९/२० मध्ये खालील योजनांच्या माध्यमातून मंजूर घरकुले या प्रमाणे संपूर्ण माणगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ७१ घरे पूर्ण केली. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून ४५, शबरी घरकूल योजना ४५, आदिम जमाती घरकूल योजना ५० तसेच आदिम जमाती घरकूल योजना सन २०१८/ १९ मधील लाभार्थ्यांस पुढीलप्रमाणे मंजुरी येऊन घरकुले पूर्ण केलेली आहेत. आदिम जमाती घरकूल योजना २७ मंजूर होऊन पूर्ण झाली आहेत. या योजनांच्या अनुषंगाने लाभार्थ्यांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी आणि घरकुले लवकर परिपूर्ण व्हावी, यासाठी शासनस्तरावर १८ नोव्हेंबर हा आवासदिन साजरा केला जातो.
माणगाव पंचायत समितीच्या माध्यमातून सत्कार करण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत विळे येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी धोंडीबा जानू कोकरे, निजामपूर ग्रामपंचायतीमधील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी नथुराम रघुनाथ हिलम, साई ग्रामपंचायतमधील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी पांड्या पुतळ्या पवार, गांगवली ग्रामपंचायतीमधील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी चंद्रकांत गंगाराम हिलम आणि आदिम जमाती आवास योजनेचे लाभार्थी प्रदीप दीपक मुकणे, संदीप नथुराम जाधव आणि केशव गौऱ्या जगताप या सात लाभार्थ्यांना माणगाव पंचायत समितीचे कार्यक्षम आणि कार्यतत्पर गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर गांगवली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पळसगाव खुर्द आदिवासीवाडी येथील आदिम जमाती आवास योजनेचे लाभार्थी संदीप नथुराम जाधव यांच्या घरकुलाच्या समोर गुढी उभारून माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी सर्व उपस्थितांच्या साक्षीने लाभार्थी दाम्पत्यांच्या समवेत गृहप्रवेश करून सर्वांना सदर योजनेसंबंधी सखोल आणि मौलिक असे मार्गदर्शन केले.
या वेळी माणगाव पंचायत समिती सभापती सुजीत शिंदे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, गटशिक्षणाधिकारी नाखले, माजी सभापती राजेश पानवकर, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, वजीर चौगुले, रणजीत लवटे आदी उपस्थित होते.