सिकंदर अनवारे, लोकमत न्यूज नेटवर्क
महाड: दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला वेगळेच महत्व आहे. आज लक्ष्मीपूजनाला गावातील हिंदू बांधवानी गावातील जामा मस्जिदीत नमाज पठण केले. या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोलादपूर तालुक्यातील कालवली गावात हिंदू मुस्लिम ऐक्याची अनोखी परंपरा गेल्या 65 वर्षापासून आजही ग्रामस्थांनी जपली आहे.
चिखलीतील बांदल यांचे काळवलीतील शिष्य गुरूवर्य सदूबाबू पार्टे तथा पार्टे बाबा आणि नानाबाबा वलीले यांच्यातील सख्य कसे झाले याबाबत कोणासही काहीही माहिती नाही. मात्र, नानाबाबा वलिले यांची ही परंपरा आजही कायम ठेवण्यास कालवली ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे. या परंपरेला गुरूशिष्य परंपरा म्हणावे अथवा मैत्री संबंध याबाबतही बुजूर्ग काही सांगू शकत नाहीत. मात्र, जो मंत्र सिध्द करायचा असतो; तो सोनू महमदच्या शाळेमध्ये म्हणजे मशिदीमध्ये नमाज पढूनच सिध्द होईल, असा उल्लेख गुरूवाणीमध्ये असल्याने गेल्या सुमारे ६५ वर्षांहून अधिक काळ याठिकाणी या विचारांच्या तीन तालुक्यांमध्ये विखुरलेल्या हिंदू बांधवांकडून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नमाज अदा केली जाते, असे यावेळी उपस्थित बुजूर्ग हिंदू बांधव आप्पा पार्टे यांनी सांगितले.
कालवली हे महाड जवळ मात्र पोलादपूर तालुक्यातील गाव आहे. गेली अनेक वर्षे या गावात सुख शांती आणि धार्मिक ऐक्य कायम आहे. गावातील सर्वजण एकमेकांच्या सुख दुःखात सामील होताना दिसतात. धार्मिक सण देखील याच भावनेतून एकमेकांना सहकार्य करत साजरे करतात. या गावात गेली अनेक वर्षे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिंदू बांधव मस्जिदिमध्ये येऊन नमाज अदा करतात. आज देखील लक्ष्मीपूजनाला हिंदू बांधवानी आपली परंपरा कायम ठेवली. येथील जामा मस्जिद मध्ये नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवानी हिंदू बांधवाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या निमित्ताने जमलेल्या हिंदू बांधवाना मुस्लिम बांधवानी दिवाळी भेट देऊन दिवाळीचा आनंद व्यक्त केला.
यावेळी कालवली वलीले मोहल्ल्यातील अब्दुलहक खलफे, महमद उस्मान खलफे, मुराद इब्राहिम वलिले, अब्दुर्रज्जाक खलफे, कालवली गावाचे इमाम मौलाना अखलाख यांनी सर्व हिंदू बांधवांचे दरवर्षीप्रमाणे नमाज पठण केल्याबद्दल आनंद व्यक्त करून ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्याहस्ते हिंदूबांधवांना भेटवस्तू प्रदान केल्या.आगामी अनेक पिढयांमध्ये ही परंपरा कायम ठेवण्याची भूमिका यावेळी बुजूर्ग आप्पा पार्टे यांनी मांडली असता वलीले मोहल्यांतील मुस्लीम बांधवांनी जामा मशिदीमध्ये नमाज पढण्यास दरवर्षी स्वागत असल्याचे आवर्जून सांगितले.