पाभरे धरण दुरुस्तीचे काम संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:20 AM2019-05-29T00:20:52+5:302019-05-29T00:20:55+5:30
तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणाऱ्या पाभरे या धरणाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून ७६ लाख ६५ हजारांचा निधी मंजूर झाला
म्हसळा : तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणाऱ्या पाभरे या धरणाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून ७६ लाख ६५ हजारांचा निधी मंजूर झाला असून या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र हे काम संथ गतीचे सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. या संदर्भात कनिष्ठ अभियंता एस.एच. चितळकर म्हणाले की, हे काम आम्हाला १२ जूनपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. परंतु संबंधित ठेकेदार व त्याठिकाणी असलेले अल्प कर्मचारी, कामगार यामुळे ज्या गतीने काम होणे अपेक्षित आहे ते होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या कामाचा उद्देश मुख्य धरणातील मुख्य पाइपलाइन यांची दुरुस्ती करावयाचे आहे. परंतु जर का हे काम पाऊस पडण्यापूर्वी झाले नाही तर पुन्हा एकदा ७६ लाख ६५ हजार पाण्यातच जातील अशी भीती टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना वाटत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास पुन्हा १०गावे आणि चार वाड्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे. आता सुरु असलेले काम हे दर्जेदार होण्यासाठी स्थानिक प्रशासन, स्थानिक प्रतिनिधी तसेच विभागाचे ग्रामस्थ यांनी विशेष लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लघुपाटबंधारे विभाग कोलाडअंतर्गत पाभरे धरणाची रखवाली करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. परंतु ते कर्मचारी धरणाकडे लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कामगार धरणाच्या पाण्यात जे पाणी पिण्यासाठी सोडण्यात येते तेथे आंघोळ करतात, मात्र याकडे संबंधित लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थ शांताराम चव्हाण यांनी सांगितले. या धरणाच्या दुरुस्तीचे काम जलदगतीने करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
>पाभरे धरणात माझ्यासमोर काम करणारे कर्मचारी कामगार चक्क आंघोळ करत होते. लघुपाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता चितळकर यांच्या समोर काम करणारे कामगार पिण्याच्या पाण्याच्या धरणात आंघोळ करत होते, परंतु त्यांना कोणीही काहीही बोलत नव्हते.
- शांताराम चव्हाण, ग्रामस्थ, विठ्ठलवाडी
लघुपाटबंधारेचे कनिष्ठ अभियंता चितळकर यांना ही बाब निदर्शनास आणल्यानंतर त्यांना विचारले असता कामगार आंघोळ करत असल्याचे मी पाहिले, मी त्यांना याबाबत तंबी दिली असून पुन्हा असे होणार नाही असे कामगारांनी सांगितले आहे.