सिडकोत प्रकल्पग्रस्तांची शंभर टक्के नोकर भरती करा, डीवायएफआयचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 04:50 PM2023-08-25T16:50:57+5:302023-08-25T16:51:07+5:30
सिडकोमध्ये इंजिनिअर,क्लार्क त्याचप्रमाणे इतर पदांसाठी नोकर भरती होणार आहे.
- मधुकर ठाकूर
उरण : सिडको महामंडळात प्रकल्पग्रस्तांचीच शंभर टक्के नोकर भरती करा अशी मागणी डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशन (डीवायएफआय) या युवक संघटनेने केली आहे. तसे न केल्यास स्थानिक भूमिपुत्र तरूण सिडको विरोधात आंदोलन करतील असा इशारा या संघटनेने दिला आहे. या संदर्भात सिडकोला मागणी पत्र देण्यात आले आहे.
सिडकोमध्ये इंजिनिअर,क्लार्क त्याचप्रमाणे इतर पदांसाठी नोकर भरती होणार आहे. त्यासाठीची सिडकोच्या विविध विभागात शेकडो पदे रिक्त आहेत.तर दुसरीकडे सिडकोमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावलून मागील दाराने नोकर भरती केली जात आहे. ती बंद करून सिडको महामंडळातील या रिक्त पदांची नोकर भरती सुरू करून या पदांवर नवी मुंबई प्रकल्पासाठी ज्या ठाणे(बेलापूर),पनवेल व उरणच्या ९५ गावातील स्थानिक भूमिपुत्रांमधूनच होण्याची आवश्यकता असताना मात्र अशा प्रकारची नोकरभरती यापूर्वी सिडकोने केलेली आहे.
त्याचप्रमाणे राज्य सरकारने सिडको बाधीत प्रकल्पग्रस्त आणि इतर प्रकल्पग्रस्तांना एक समान न ठरवता यांच्यातील फरक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्याची ही मागणी करण्यात आली आहे. कारण येथील ९५ गावातील शेतकरी आणि त्यांचे वारस हे भूमीहीन आहेत. अशा प्रकारचा राज्यात आणि देशात कोणताही प्रकल्प नाही. त्यामुळे अपवाद म्हणून सिडकोच्या नोकर भरतीत नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचीच शंभर टक्के नोकर भरतीची तरतूद करण्याची मागणी डीवायएफआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष दिनेश म्हात्रे यांनी केली आहे. तसे न केल्यास सिडको विरोधात भूमिपुत्र तरुण तीव्र आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी मागणी पत्रातुन दिला आहे.