जेएनपीटीतील भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये प्रकल्पग्रस्तांची भरती
By admin | Published: May 20, 2017 04:38 AM2017-05-20T04:38:28+5:302017-05-20T04:38:28+5:30
नव्याने सुरू होत असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये (बीएमसीटी) कामगार भरती भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांमधूनच केली जाणार आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : नव्याने सुरू होत असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये (बीएमसीटी) कामगार भरती भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांमधूनच केली जाणार आहे. २०१७ च्या अखेरीस पूर्णत्वास जाणाऱ्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात १०० तर दुसऱ्या टप्प्यात २०० प्रकल्पग्रस्तांची भरती केली जाणार असल्याची माहिती प्रकल्पाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये पहिल्यांदाच आॅनलाइन कामगार भरती प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या ७०० पेक्षा अधिक प्रकल्पबाधित भूमिपुत्र उमेदवार पहिल्या १०० जागांसाठी पात्र ठरले आहेत. आता आॅनलाइन नोकरभरतीमध्ये अर्जासाठी उमेदवारांना दलालांना पैसे देण्याची गरज भासणार नाही. यासाठी उमेदवारांनी थेट वेबसाईटवर त्यांचा अर्ज अपलोड करण्याच्या सूचना प्रकल्पाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच प्रकल्पबाधितांना नोकरी मिळण्याची खातरजमा करण्यासाठी भारत मुंबई कंटेनर टर्मिनलने अर्जातील कमाल वयाची मर्यादा जेएनपीटीच्या इतर टर्मिनलमधील असलेली २५ वर्षांची मर्यादा ३० वर्षापर्यंत वाढविली आहे. प्रकल्पातील बहुतांश कामे तांत्रिक पद्धतीने होणार असल्याचे उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता पदवी किंवा टेक्निकल डिप्लोमापर्यंत ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील भरती होणाऱ्या १०० जागांपैकी ७५ जागा इक्वीपमेंट आॅपरेटर आणि २५ जागा टेक्निशियनसाठी असणार आहेत. नोकर भरतीमध्ये रुजू होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पामार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
भारत मुंबई कंटेनर टर्मिनल हे भविष्यात देशातील सर्वात मोठे टर्मिनल असणार आहे. यामुळे विविध समभागधारकांच्या माध्यमातून आसपासच्या भागात दोन हजारांहून अधिक लोकांसाठी अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. यामध्ये ट्रक ड्रायव्हर्स, टॅलीमेन, एजंट्स आणि क्लरीकल स्टाफ अशा कामगारांचा समावेश असेल. यातील अनेक कामांमध्ये पदवीची गरज भासणार नसल्याचा दावाही प्रकल्पाच्या अधिकृत सूत्रांची केला.
भारत मुंबई कंटेनर टर्मिनलतर्फे जवाहरलाल बंदरावर चौथे कंटेनर टर्मिनल उभारण्यात येत आहे. भारत मुंबई कंटेनर टर्मिनल हा बंदर प्रकल्प क्षेत्रातील पब्लिक- प्रायव्हेट- पार्टनरशिप (पीपीपी) मधील सर्वात मोठी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. या टर्मिनलची उभारणी २०१५ मध्ये सुरू करण्यात आली आहे. २०१७ या वर्षाच्या अखेरीस या प्रकल्प पूर्णत्वास जावून कामकाज सुरु होणार आहे.
- जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती करणारी फॉक्सकॉन कंपनी आगामी काळात जेएनपीटीच्या स्पेशल इकॉनॉमिक्स झोनमध्ये (सेझ) उत्पादन केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. जगभरात जेएनपीटीची ओळख आणखी दृढ होण्यास हातभार भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या प्रकल्पामुळे लागणार असल्याचा दावाही प्रकल्पाकडून केला आहे.