अलिबाग - इर्शाळवाडी दरड दुर्घटना गुरुवारी झाल्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ पथकाकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू केली होती. दिसभरात १६ जणांचे मृतदेह काढण्यात पथकाला यश आले होते. गुरुवारी चार वाजल्यानंतर शोध मोहीम थांबविण्यात आली होती. आज शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता एनडीआरएफ पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. पाऊस ही पडत असल्याने काही प्रमाणात शोध मोहिमेत अडचणी येत आहे. आज २१ जुलै रोजीही जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर झाला आहे.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. दरडी खाली शेकडो नागरिक सापडले. दुर्घटना झाल्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले होते. डोंगर भागावर हे गाव असल्याने कोणतेही यंत्रसामुग्री पोहचणे अवघड आहे. त्यामुळे पावडे, घमेल आणि इतर हाती सामग्रीने शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. पावसाचा जोर असतानाही पथक हे आपले काम बजावत आहेत. शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजल्यापासून पथक यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आज शोध मोहिमेत कोणाचे मृतदेह भेटतात का किंवा कोणी दैव कृपेने जिवंत आहे का याचा शोध पथकातर्फे सुरू आहे.
जिल्ह्याला आज रेड अलर्ट
रायगड जिल्ह्याला शुक्रवार पुन्हा हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सकाळ पासून पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. रेड अलर्ट असल्याने सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.