कर्जत : जगभर कोरोनाचे संकट पसरले आहे. ते भारतातसुद्धा येऊन धडकले आहे. हे संकट रोखण्यासाठी २२ मार्चला लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. कधी नव्हे ती रेल्वेची चाकेही थांबली आणि त्याचबरोबर गरिबांचे हक्काचे वाहन लाल परी म्हणजे एसटी सेवासुद्धा बंद करण्यात आली. मंगळवारी ७९ दिवसांनंतर कर्जत आगारातून प्रवाशांसाठी एसटी सेवा सुरू झाली. त्यामुळे सर्वसामान्यांची चांगली सोय झाली.
एसटी म्हणजे सर्वसामान्यांचे हक्काचे वाहन. ही सेवा सुमारे अडीच महिन्यांच्या वर बंद होती. त्यामुळे गरीब जनतेचे अतोनात हाल झाले. काही दिवसांपूर्वी परप्रांतीय प्रवाशांना त्यांच्या राज्यात नेण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध केली होती. शासनाने प्रवाशांसाठी एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वसामान्यांना हायसे वाटले.कर्जत आगारात आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी सर्व एसटी बसची पाहणी केली आणि प्रवाशांची ने-आण करण्यासाठी बस तयार ठेवल्या. मंगळवारी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी पहिली कर्जत-खोपोली एसटी बस सुटली. त्यांनतर सात वाजता कर्जत-पनवेल ही एसटी सुटली. प्रत्येक बस निर्जंतुकीकरण केली जात होती.प्रत्येक प्रवाशाच्या हातावर वाहक सॅनिटायझर देऊन एसटीत घेत होते. केवळ २२ प्रवाशांनाच प्रवास करण्याची सुविधा होती. प्रत्येक फेरी बस निर्जंतुकीकरण करूनच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येत होती.सुमारे अडीच महिने एसटी सेवा बंद होती. आज पनवेल, खोपोलीसाठी सेवा सुरू होत आहे. प्रत्येक बसचे प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण करण्यात येते. टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्यात येणार आहेत. सेवा पुन्हा सुरू झाल्याने थोडा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.- शंकर यादव, आगार व्यवस्थापक, कर्जत-रायगड.अशा होणार फेऱ्याकर्जत-खोपोली : ६.१० आणि ७.३०खोपोली-कर्जत : १९.४५ आणि २१.१५कर्जत-पनवेल : ७, ७. ४५, ९.३०, १०, १२,१२.३०,१४.३०, १५,१७, १७.३०, १९.३०,२०पनवेल-कर्जत : ८.१५, ९,१०.४५, ११.१५,१३.१५,१३.४५, १५.४५,१६.१५,१८.१५, १८.४५, २०.४५,२१.१५खोपोली-पनवेल : ७.३०, ८.३०, १०, ११,१२.३०,१३.३०, १५, १६, १७.२०,१८.३०पनवेल-खोपोली : ८.४५,९.४५, ११.१५, १२.१५, १३.४५, १४.४५, १६.१५, १७.१५, १८.३०,२०