महाडमध्ये एमआयडीसीतील कंपनीबाहेरलाल रंगाचे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:38 PM2019-08-27T23:38:33+5:302019-08-27T23:39:08+5:30

केमोसोलवर कारवाईची मागणी : चार महिन्यांपासून प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष

red water at Outside the company at MIDC in Mahad | महाडमध्ये एमआयडीसीतील कंपनीबाहेरलाल रंगाचे पाणी!

महाडमध्ये एमआयडीसीतील कंपनीबाहेरलाल रंगाचे पाणी!

Next

सिकंदर अनवारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील केमोसोल कंपनीतून बाहेर पडणारे लाल रंगाचे पाणी गेल्या चार महिन्यांपासून सुरूच आहे. कंपनीवर सध्या बंदची कारवाई केली असली तरी बंद कंपनीतूनही लाल रंग बाहेर पडत असल्याने प्रदूषण मंडळाच्या कामगिरीवर आश्चर्य व्यक्त होत आहे.


महाड एमआयडीसीमधील केमोसोल या कंपनीतून गेल्या चार महिन्यांपासून लाल रंगाचे पाणी बाहेर पडत आहे. जीर्ण इमारतीमध्ये कंपनीत खाद्यरंगाचे उत्पादन केले जात असल्याची माहिती प्रदूषण मंडळाने दिली. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच हा रंग बाहेर पडत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न समोर आला. याबाबत स्थानिक पातळीवर आवाज उठल्यानंतर प्रदूषण मंडळ जागे झाले. कंपनीचे उत्पादन प्रदूषण मंडळाने बंद केले. कंपनीचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठाही बंद करण्यात आला आहे. सध्या कंपनी बंद असली तरीही कंपनीच्या आवारातून लाल रंगाचा निचरा काही केल्या थांबत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सतत पडत असलेल्या पावसाच्या पाण्याला लाल रंग तयार होत आहे. केमोसोल कंपनीच्या मागील बाजूने रंगीत पाणी गटाराला मिळत आहे. हे गटार महाड औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या जवळ असलेल्या गटाराला येऊन मिळत असल्याने प्रदूषण दिसून येत आहे.


केमोसोल ही कंपनी खाद्यरंग तयार करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी हा रंग बनवला जात आहे तो परिसर आणि कंपनीची इमारत जीर्ण झाली आहे. याच ठिकाणी कंपनी कामगार जीव धोक्यात घालून काम करत होते. यामुळे कामगार सुरक्षा अधिकारी, एमआयडीसी आदी संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत कंपनीला बंदचा आदेश दिल्यानंतर कंपनी उत्पादन बंद करण्यात आले आहे. कंपनीचे उत्पादन बंद असले तरी कंपनी आवारात टाकण्यात आलेल्या भरावात हा रंग दाबण्यात आला आहे. यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर हा लाल रंग बाहेत पडत आहे. हा लाल रंग गटाराच्या पाण्यातून अग्निशमन दलाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत येत आहे. हा रंग खाद्य प्रकारात असला तरी सर्वसामान्य नागरिकांना लाल रंगाचे दिसणारे प्रदूषणघातक वाटत आहे.


केमोसोल कंपनीला बंदची नोटीस देऊन प्रदूषण मंडळाने आपली जबाबदारी झटकली आहे. कंपनी आवारात पडलेला चिखल आणि भरावात टाकलेल्या रंगाबाबतही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अशा प्रकारची कारवाई होत नसल्याने महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मात्र तात्पुरती नोटीस दाखवून स्थानिक नागरिकांना गप्प करण्याचे काम करत आहेत अशी धारना नागरिकांची झाली आहे.

कारखाना प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची गरज
च्गेले चार महिने या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात लाल रंगाचे पाणी वाहत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जरी हा कारखाना बंद केला असला तरी लाल पाणी थांबवण्यास अपयश आले आहे. गेले चार महिने कारखाना प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला फाट्यावर मारत लाल पाणी थांबवण्यासाठी उपाययोजना केली नाही. अशा परिस्थितीत बेजबाबदार वागणाऱ्या कारखाना प्रशासनावर प्रदूषण मंडळाने गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

कारखान्याला बंदची नोटीस देण्यात आली आहे. वाहणाºया पाण्याला थांबवण्यासाठी छोटे बंधारे घालून सलज उचलण्याचेही तोंडी निर्देश देण्यात आले आहेत.
- संदीप सोनवणे, क्षेत्र अधिकारी, प्रदूषण मंडळ, महाड

Web Title: red water at Outside the company at MIDC in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.