तोफांच्या संवर्धनाला लालफितीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 05:00 AM2019-01-06T05:00:16+5:302019-01-06T05:00:38+5:30
पुरातत्त्व विभागाचा पुढाकार : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिरंगाई
मुंबई : मरिन लाइन्स येथील महात्मा गांधी मार्गावर असलेल्या क्रॉस मैदानातील दोन तोफा संवर्धनाअभावी गंज खात पडून आहेत. या तोफांच्या संवर्धनाची जबाबदारी पुरातत्त्व विभागाने घेतल्यानंतरही केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगी अभावी त्या धूळखात पडून आहेत. चोरट्यांकडून तोफांची विल्हेवाट लावण्याआधी तरी जिल्हाधिकारी कार्यालय तोफा हलविण्यास परवानगी देणार का? असा सवाल दुर्गप्रेमींनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणात क्रॉस मैदानात दोन तोफा गंजत पडल्याची बाब सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेने पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या निदर्शनास आणून देत संवर्धनाची मागणी केली होती. त्याची दखल घेत संबंधित तोफा संचालनालयाच्या आवारात हलविण्याचा निर्णय पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाने संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी
घेतला.
नियमानुसार मैदानातून संचालनालयाच्या आवारात तोफा हलविण्यासाठी मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला गर्गे यांनी पत्र पाठविले. मात्र, त्यास २० दिवस उलटल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने, तोफा चोरीला जाण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.
सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, क्रॉस मैदानात दोन तोफा दुरवस्थेत असल्याची माहिती प्रतिष्ठानने संचालनालयास १३ डिसेंबरला दिली होती, तसेच सुट्ट्या स्वरूपात पडलेल्या या दोन्ही तोफा उघड्यावर असल्याने, धातू वितळविण्याच्या एखाद्या चोरांच्या टोळीद्वारे घेऊन जाण्याची शक्यता प्रतिष्ठानने व्यक्त केली होती. त्याची दखल घेत संचालनालयाद्वारे दुसºयाच दिवशी, अर्थात १४ डिसेंबरला या तोफांची पाहणी केली होती.
तोफांची सद्यस्थिती पाहता, त्यांची पुरातत्त्वीयदृष्ट्या नोंद घेणे आवश्यक असल्याची बाब संचालकांनी नोंदविली. या कामात संचालनालयाच्या मुख्यालय आवारात तोफा हलविण्याची संपूर्ण जबाबदारी सह्याद्री प्रतिष्ठानने घेतली. मात्र, नेमक्या तोफा कधी हलवायच्या, याबाबत संचालनालयाने कोणतीही माहिती दिली नसल्याचेही रघुवीर यांनी सांगितले.
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालकांनी संबंधित तोफा चोरीला जाण्याची भीती जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. दरम्यान, समाजकंटकांनी तोफांचा काही भाग चोरी केल्याचे धक्कादायक वास्तव तोफांची पाहणी केल्यास लक्षात येते. त्यामुळे संपूर्ण तोफा चोरीला गेल्यानंतर प्रशासन संवर्धनास परवानगी देणार का, असा संतप्त सवाल दुर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे.
तोफांचा इतिहास काय सांगतो?
काही दिवसांपूर्वी राजभवनात सापडलेल्या दोन २२ टन वजनी तोफांच्याच प्रकारातील एक तोफ क्रॉस मैदानात आहे. वजनाने हलकी असलेली ही तोफ सीकॉस्ट कॅनोन प्रकारातील आहे. तर या ठिकाणी सापडलेली दुसरी तोफ पोर्तुगीज बनावटीची आहे. या तोफेवर १८५६ सालचा उल्लेखही आहे.