मधुकर ठाकूर
उरण : १७ हेक्टर क्षेत्रावर फेर पुनर्वसन करण्याचे वारंवार आश्वासन देऊनही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या तोंडाला जेएनपीएने पुसली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी रविवारीच (८) जुन्या मुळ गावठाणातील जागेचा ताबा घेण्यासाठी कुटूंबियांसह जेएनपीए प्रशासनाविरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी शेवा-कोळीवाडा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी ३५ वर्षांपूर्वी शासनामार्फत सिडकोने संपादन करण्यात आल्या आहेत. बंदर उभारण्यापुर्वीच शेवा- कोळीवाडा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन बोरी-पाखाडी येथे करण्यात आले आहे.शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून १७ हेक्टर ऐवजी फक्त दोन हेक्टर जमीनीवर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवी लागली आहे.वाळवीने पोखरलेली ग्रामस्थांची घरे एकापाठोपाठ एक अशी कोसळली आहेत.हनुमान कोळीवाडा वाळवीने पोखरले गाव अशीच ओळख देशभरात झाली आहे. तेव्हापासुनच शासनाच्या नियमानुसार १७ हेक्टर विकसित जागेतच वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावातील रहिवाशांचे फेर पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी केंद्र,राज्य, जेएनपीए, सिडको, महसूल, पोलिस प्रशासनाशी ग्रामस्थांचा मागील ३५ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.
संघर्षानंतर जेएनपीए, सिडको, महसूल विभागाने लागलीच १७ हेक्टर जमीन देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.जेएनपीए, सिडको, महसूल विभागाने लागलीच १७ हेक्टर जमीन देण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.मात्र तांत्रिक कारणे पुढे करून जेएनपीए, सिडको, महसूल विभागाकडून वारंवार फेर पुनर्वसनासाठी जागा देण्यासाठी अखंडपणे चालढकल करुन ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.त्यामुळे आता भू-संपादन केलेल्या जमिनीचा वापर केला नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रविवारी ( ८) मुळ गावठाणातील जागेचा ताबा घेण्यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज रस्त्याची साफसफाई तर उद्यापासून मूळ जागेचा ताबा घेण्यासाठी ग्रामस्थ हल्लाबोल करतील.
जागेचा ताबा मिळेपर्यंत जेएनपीए,शासनाविरोधात सुरू करण्यात आलेला संघर्ष सुरूच राहणार आहे. आता माघार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली असल्याची माहिती ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली. दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी जेएनपीए प्रशासन भवन,रस्ते व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून १२५ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली.