अलिबाग : आगामी निवडणुकांसाठी १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तींची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत त्याची मुदत आहे. आतापर्यंत नवीन मतदार नोंदणीसाठी या अभियानात ३६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.जिल्ह्यात महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, उद्योग क्षेत्रात तसेच घरोघरी जाऊन निवडणूक कर्मचारी नाव नोंदणीसाठी आवश्यक फॉर्म क्रमांक ६ भरून घेत आहेत. तरी सर्व नवमतदारांनी आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी आपल्या नजीकच्या मतदार नोंदणी कर्मचाºयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे केले.आगामी निवडणुकांसंदर्भात सुरू असलेल्या मतदार नोंदणी अभियान, तसेच मतदारयादी संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्र म व मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र यांची प्रथमस्तरीय चाचणीबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.जिल्ह्यात मतदार पुनर्रिक्षण कार्यक्र म सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत नवीन नाव नोंदणी, नवमतदार नाव नोंदणी, तसेच नावे वगळणे, दुबार नावे छाननी व वगळणे अशी कामे सुरू आहेत. नवीन मतदारांची नावे नोंदविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आदिवासी पाड्यांवर जाऊन नाव नोंदणी करणे, प्रत्येक महाविद्यालयातील नव मतदारांची नाव नोंदणी करणे, त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात एक अध्यापक नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. ३१ तारखेपर्यंत ही मोहीम सुरू असल्याने मतदारांनी आपले अर्ज तत्काळ द्यावे, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले.जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २ हजार ६९३ मतदान केंद्रांकरिता मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. त्यात कंट्रोलिंग युनिट ३ हजार ३२६, मतदान युनिट ५ हजार ७२१ आहेत. याशिवाय ३ हजार ३२६ व्हीव्हीपॅट यंत्रे आहेत. या यंत्रांची प्रथमस्तरीय चाचणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने उपस्थित होत्या.>प्रत्येक मतदान केंद्रनिहाय दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोपे जावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आहेत. दिव्यांगांसाठी कार्य करणाºया संस्था, संघटनांची मदत घेतली जात आहे. मतदान केंद्र अधिकारी व दिव्यांग संस्था संघटनांचे पदाधिकारी यांच्या संयुक्त मतदान केंद्र भेटी आयोजित करण्यात येत आहे.
जिल्ह्यात ३६ हजार नवमतदारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:48 PM