रायगड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 45 हजार 338 मतदारांची नोंदणी, निवडणूक पुढे ढकलल्याने नोंदणी पुन्हा सुरू

By निखिल म्हात्रे | Published: May 31, 2024 02:04 PM2024-05-31T14:04:07+5:302024-05-31T14:05:00+5:30

कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत येत्या जुलैला संपत असल्याने कोकणात निवडणुकीचे वेध लागले होते. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती.

Registration of 45 thousand 338 voters for graduate constituency in Raigad district, registration resumes after postponement of election | रायगड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 45 हजार 338 मतदारांची नोंदणी, निवडणूक पुढे ढकलल्याने नोंदणी पुन्हा सुरू

प्रतिकात्मक फोटो...

अलिबाग - कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात 45 हजार 338 इतकी पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात पुरुष मतदार 25 हजार 724, महिला मतदार 19 हजार 697 आणि तृतीय पंथी पदवीधर मतदार 7 आहेत. सर्वाधिक मतदार पनवेल तालुक्यात असून त्यांची संख्या 15 हजार 675 इतकी आहे. निवडणूक पुढे ढकलल्याने कोकण पदवीधर संघासाठी मतदार नोंदणी पुन्हा सुरू झाली आहे.

कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत येत्या जुलैला संपत असल्याने कोकणात निवडणुकीचे वेध लागले होते. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलैला संपत आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. 8 मे रोजी निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लगेचच या चार विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार होते.  येत्या 10 जून रोजी मतदान तर 13 जूनला मतमोजणी होणार होती.

मात्र राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट‌या सुरू असून शाळा 10 ते 15 जूनच्या दरम्यान भरणार आहेत. अनेक शिक्षक मतदार उन्हाळी सुट्टीसाठी आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी राजकीय पक्ष तसेच लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यापूर्वी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक पुढे गेल्याने आता या मतदारसंघांतील मतदारनोंदणी आता पुन्हा सुरू झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात पदवीधर मतदारांनी मतदार नोंदणी मोठा प्रतिसाद दिला आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत पदवीधर मतदान नोंदणीसाठी विविध उपक्रम घेण्यात आले आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघातील रायगड जिल्हयात एकूण 36 मतदान केंद्रे आहेत. सर्वाधिक मतदान केंद्र आणि मतदार हे पनवेल तालुक्यात आहेत. 1 जानेवारी 2024 पर्यंत पनवेल तालुक्यातील 9 मतदान केंद्रांसाठी 15 हजार 675, उरण तालुक्यातील दोन मतदान केंद्रांसाठी 3 हजार 582, कर्जत तालुक्यातील तीन मतदान केंद्रांसाठी 2 हजार 890, खालापूर तालुक्यातील दोन मतदान केंद्रांसाठी 2 हजार 386, पेण तालुक्यातील तीन मतदान केंद्रासाठी 4 हजार 807, अलिबाग तालुक्यातील 4 मतदान केंद्रांसाठी 3 हजार 695, सुधागड तालुक्यातील एक मतदान केंद्रासाठी 1 हजार 84, रोहा तालुक्यातील दोन मतदान केंद्रासाठी 3 हजार 457, मुरुड तालुक्यातील एक केंद्रासाठी 937, तळा तालुक्यातील एक केंद्रासाठी 291, माणगाव तालुक्यातील दोन केंद्रांसाठी 1 हजार 884, म्हसळा तालुक्यातील एक केंद्रासाठी 566, श्रीवर्धन तालुक्यातील दोन मतदान केंद्रांसाठी 621, महाड तालुक्यातील 2 मतदान केंद्रांसाठी 2 हजार 931, पोलादपूर तालुक्यातील एक मतदान केंद्रासाठी 622 अशा एकूण 45 हजार 288 मदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. यात पुरुष मतदार 25 हजार 724, महिला मतदार 19 हजार 697 आणि तृतीय पंथी पदवीधर मतदार 7 आहेत. सर्वाधिक मतदार पनवेल तालुक्यात असून त्यांची संख्या 15 हजार 675 इतकी आहे.

रायगडमधील मतदार नोंदणी
1) पनवेल - 15675
2) उरण - 3582
3) कर्जत - 2890
4) खालापूर - 2386
5) पेण - 4807
6) अलिबाग - 3605
7) सुधागड - 1084
8) रोहा - 3457
9) मुरुड - 937
10) तळा - 291
11) माणगाव - 1884
12) म्हसळा - 566
13) श्रीवर्धन - 621
14) महाड - 2931
15) पोलादपूर - 622
 

Web Title: Registration of 45 thousand 338 voters for graduate constituency in Raigad district, registration resumes after postponement of election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.