“इर्शाळवाडीचे पुनर्वसन सहा महिन्यांत, सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होणार”: CM एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 05:56 AM2023-08-16T05:56:28+5:302023-08-16T05:57:16+5:30
पुनर्वसनाबाबत आराखडा, जागा, दळणवळण विकास यावर चर्चा करून रोजगाराबाबत तरुणांना नोकरी आणि व्यवसायाची हमी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मोहोपाडा : इर्शाळवाडीच्या पुनर्वसन संदर्भातील सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण केली आहे. सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून येत्या सहा महिन्यांत इर्शाळवाडीचे पुनर्वसन होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी स्वातंत्र्य दिनी दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीच्या पुनर्वसन केलेल्या तात्पुरत्या कंटेनर हाऊसमधील निवारा ठिकाणी भेट दिली. अधिकारी आणि दुर्घटनाग्रस्त यांच्याबरोबर चर्चा करून पुनर्वसनाबाबत आराखडा, जागा, तेथील दळणवळण विकास यावर चर्चा करून रोजगाराबाबत तरुणांना नोकरी आणि व्यवसायाची हमी दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, झालेली दुर्घटना दुर्दैवी होती. पण प्रशासनाने तत्परतेने पुनर्वसनाचे काम सुरू केले.
विरोधकांना बोलत राहू देत...
मुख्यमंत्री बदलाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या चर्चेबाबत विचारणा केली असता शिंदे म्हणाले, आमचे सरकार स्थापन झाल्यापासून ते वारंवार सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार, अशी हेकाटी पेटत आहे. मात्र, आमचे काम जोमाने सुरू आहे. ते बोलत राहू दे, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आमच्या सरकारवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.