उरण : वाढत्या उष्णतेमुळे वन्यजीवांची तडफड सुरू आहे. त्यामुळे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी जंगल परिसरातील सुप्तावस्थेत असलेले नैसर्गिक पाणवठे पुनर्जीवित करण्याची स्तुत्य मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवड्यापासून उरण परिसरात उन्हाचा पारा ४० ते ४३ अंशावर पोहोचला आहे. भविष्यात पारा आणखी कितीवर पोहोचेल सांगता येत नाही. पारा वाढला की साहजिकच पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊ लागते. मानवाला जशी पाण्याची टंचाई निर्माण होते, तशी ती वन्यजीव आणि पक्ष्यांनाही निर्माण होते. पाण्याच्या शोधात प्राण्यांना इतर ठिकाणी जाताना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठ्यांवर येणाऱ्या भेकर, रानडुक्कर, ससे यांची परिसरात सर्रास शिकार होत असते. अशा या तहानलेल्या वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उरण तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी एक मोहीम हाती घेत प्रयत्न सुरू केले.कडापे गावाच्या जंगल परिसरात काही नैसर्गिक पाणवठे सुप्तावस्थेत आहेत. तर काहींचे पाणी थोड्या-अधिक प्रमाणात बारमाही काळातही काळ्या पाषाणातून पाझरत असते. अशा सुप्त पाणवठ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर साचलेली माती, दगड बाजूला सारून पुन्हा पुनर्जीवित करण्याचे काम या संस्थेच्या सदस्यांनी सुरू केले आहे. या अनोख्या मोहिमेत जयवंत ठाकूर, सृष्टी ठाकूर, राजेश पाटील, शेखर म्हात्रे, गोरख म्हात्रे, प्रणव गावंड, निकेतन ठाकूर, राकेश म्हात्रे, किशोर पाटील, अंगराज म्हात्रे आदी सहभागी झाले आहेत. त्यांंच्या या प्रयत्नांतून आतापर्यंत पाच-सहा पाणवठे पुनर्जीवित करण्यात यश आले आहे. वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी संस्थेचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे सदस्यांकडून सांगितले जात आहे.
जंगलातील नैसर्गिक पाणवठे केले पुनर्जीवित, फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेची स्तुत्य मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 1:44 AM