सिकंदर अनवारे ।दासगाव : मुंबई - गोवा महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेले महाड तालुक्यातील टोळ - नांदवी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर वाहने नादुरुस्त होत असल्याने एसटी महामंडळाने आणि खासगी वाहतूक करणा-या वाहन चालकांनी या मार्गी प्रवासी वाहतूक बंद केली आहे. यामुळे टोळ आणि नांदवी या दरम्यानचे ग्रामस्थ प्रवासात नरकयातना सोसत आहेत. याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून त्यांना पायपीट करावी लागत आहे.महाड आणि माणगाव या दोन तालुक्यांना जोडणाºया टोळ - नांदवी या रस्त्याची दुरवस्था होऊन प्रवासी वाहतूक बंद झाल्याने येथील ग्रामस्थ नरकयातना भोगत आहेत. टोळ-नांदवी हा रस्ता केवळ सहा किमीचा आहे. या दरम्यान टोळ, टोळ बु., भांडिवली, नांदवी अशी तीन गावे व वाड्या येतात. पूर्वेला काळ नदी आणि पश्चिमेला उंच डोंगर आणि या डोंगराच्या कुशीत वसलेली ही गावे अशी येथील भौगोलिक परिस्थिती आहे. या गावांना जोडणारा रस्ता रायगड जिल्हा परिषदेकडे देखभाल आणि दुरुस्तीसाठी आहे. गेली अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या संपूर्ण दुरुस्तीचे काम केले गेले नसल्याने आज या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.रस्त्याची दुरवस्था म्हणजे केवळ खड्डे पडले अशी अवस्था नाही तर लांबी रुंदीला ७ ते ८ फूट आणि खोलीला फूटभर असे महाकाय खड्डे या रस्त्यावर निर्माण झाल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा फटका एसटी महामंडळाच्या वाहनांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाºया नुकसानीमुळे वाहन चालकांना आणि एसटी महामंडळाने या रस्त्यावर वाहने चालविणे बंद केले आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला असून शिक्षणासाठी सहा किमीची पायपीट करावी लागत आहे. टोळ गावातील अनेक विद्यार्थी गोरेगाव आणि नांदवी येथे शिक्षणासाठी जातात. या रस्त्यावरून एसटी आणि खासगी प्रवासी वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. काही सधन घरचे विद्यार्थी आर्थिक भुर्दंड सोसत टोळ गावातून महामार्गावर येतात आणि पुढे लोणेरे गोरेगाव-नांदवी असा सहा किमी ऐवजी १५ किमीचा प्रवास करतात. मात्र गरीब घरातील विद्यार्थ्यांना पायपीट करण्याशिवाय पर्याय राहत नाही. दोन्ही विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास खराब रस्त्यामुळे सहन करावा लागत आहे. यापेक्षा वेगळी अवस्था येथील ग्रामस्थांची नाही. ग्रामस्थ देखील पायपीट करण्याचा त्रास सहन करीत आहेत. मात्र जरुरीचे काम नसले तरी ग्रामस्थ प्रवास आजचा उद्यावर टाकीत आहेत.या भागात आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे मात्र ेअशा दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना अतोनात हाल होत आहेत.एसटी बंद असल्याने मुली मोफतसेवेपासून वंचितमुलींच्या शिक्षणावर अधिक भर देण्यासाठी शासनाने काढलेल्या वेगवेगळ्या योजनांमध्ये विद्यार्थ्यांना फ्री एसटी पासची सवलत आहे. टोळ ते नांदवी दरम्यान शिक्षणासाठी दर दिवशी प्रवास करणाºया १५ ते २० विद्यार्थिनी आहेत.या विद्यार्थिनींना एसटीचा मोफत पास मिळाला आहे. मात्र एसटीच्या या मार्गी फेºया बंद करण्यात आल्यामुळे या पासचा विद्यार्थ्यांना काही उपयोग होत नाही. विविध योजनांप्रमाणे ही देखील योजना रस्ता नादुरुस्त असल्याने कागदावरच राहून विद्यार्थिनींना प्रवासाच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.उलट सकाळी लवकर उठून शिक्षणासाठी सहा किमी अंतराची पायपीट करावी लागत आहे. टोळ ते नांदवी दररोज सुमारे ५० ते ६० विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेत जातात. वाहनांची सुविधा नसल्याने पायी चालत जाण्यासाठी या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेआधी दोन ते तीन तास घरातून बाहेर पडावे लागते. एवढाच वेळ घरी परत येण्यासाठी लागतो. रोजच्या पायपिटीमुळे विद्यार्थ्यांना शारीरिक श्रम होतात, त्यापेक्षा त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जात आहे.>रस्ते नादुरुस्त असल्याचा अहवाल माणगाव एसटी आगाराकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार एसटीच्या टोळ मार्गे नांदवी-गोरेगाव जाणाºया एसटीच्या फेºया बंद करण्यात आल्या आहेत.- शिवाजी जाधव, वाहतूक निरीक्षक, महाड आगारधोका पत्करून चालवल्या जातात खासगी गाड्यामोबाइल आणि वाहन ही आता माणसाची मूलभूत गरज झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबात देखील किमान दुचाकी गाडी आढळून येते. रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. प्रवासी वाहतूक करणाºया गाड्या बंद झाल्या आहेत. असे असले तरी वेळ वाचविण्याची अनेक ग्रामस्थ वाहन नादुरुस्त होण्याची भीती असली तरी स्वत:च्या गाड्या चालवित आहे.मुख्यमंत्री सडक योजनेमधून रस्ता मंजूरमहाड आणि माणगाव या दोन तालुक्यांना जोडणारा हा टोळ-नांदवी रस्ता सध्यातरी रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याच्या नूतनीकरणाची मंजुरी मुख्यमंत्री सडक योजनेतून करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत अधिकृत खुलासा मिळाला नसला तरी माणगाव विभागामार्फत येत्या काही दिवसांत या रस्त्याला नव्याने बनवण्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आहे.>नेत्यांची घरे असूनही दुर्लक्षमहाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री तथा लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचे मूळ गाव नांदवी हे आहे. तर माजी आमदार श्याम सावंत यांचे मूळ गाव भांडीवली हे आहे.ही दोन्ही गावे जोशी आणि सावंत या दोन दिग्गज नेत्यांची असून देखील या रस्त्याकडे आजपर्यंत कोणी गांभीर्याने पाहिले नाही. सण, उत्सव आणि घरगुती कार्यक्रमाच्या काळात हे नेते आपल्या घरी आवर्जून येत असले तरी येथील रस्त्याच्या समस्येकडे कोणाचेही लक्ष नाही.
टोळ-नांदवी रस्त्याची दुरवस्था, विद्यार्थी, ग्रामस्थांची पायपीट, वाहनचालकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 2:49 AM