- सिकंदर अनवरे, दासगाव
महाडमधील सावित्री पुलाच्या दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींचा आणि वाहनांचा चौथ्या दिवशीदेखील शोध सुरूच आहे. अद्याप केवळ २३ मृतदेहच हाती लागले असून, अद्याप न मिळालेल्या मृतदेहांच्या नातलगांच्या नजरा सावित्री पात्रात सुरू असलेल्या शोधकार्याकडे लागल्या आहेत. वाहून गेलेल्या वाहनांच्या शोधाकरिता प्रशासनाने आज पुन्हा नौदल आणि एन. डी. आर. एफ.च्या जवानांची मदत घेतली; मात्र दिवसभरात वाहने मिळू शकली नाहीत. अपघातातील दोन एसटी बसेस आणि तवेरा कार अद्याप न मिळालेली नाही. जयगड-मुंबई एसटीचे चालक आणि वाहक या दोघांचाही अद्याप पत्ता लागलेला नाही. जयगड गाडीचे चालक मुंडे हे मूळचे परभणी गावचे असल्याने त्यांचे नातेवाईक मुंडे यांचा मृतदेहाचा ताबा घेण्याकरिता परभणी येथून आले आहेत. मात्र त्यांच्या नजरा या शोधकार्याकडे आहेत. त्याचप्रमाणे एसटी आणि तवेरा कारमधीलदेखील अद्याप काही प्रवाशांचा मृतदेह मिळालेले नाहीत. त्यांचे नातेवाईकदेखील ट्रामा केअरमध्ये गमावलेल्या माणसाच्या मृतदेह कधी येईल याकडे नजरा लावून बसले आहेत. गाड्यांचा शोध अद्याप लागलेला नसल्याने बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी एका होडीची व्यवस्था करत थेट नदीत शोध सुरू केला. या होडीखालून एक कॅमेरा सोडण्यात आला आणि होडीमध्ये डिजिटल स्क्रीनची सुविधा होती. मात्र या होडीत शोधकार्य करणारे जवान आणि तंत्रणाची गरज असताना आमदार आणि नामदारांनी होडीतून फेरी मारण्याची हौस भागवून घेतली, अशी चर्चा सुुरू आहे. ४६ रुग्णवाहिका तैनातमृतदेह महाडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले जात आहेत. मृतदेहांना दोन दिवस उलटल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर नेण्याकरिता या ठिकाणी जवळपास ४६ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये शासनाच्या १०८ नंबर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अशा मिळून ३६ तर नाणीजच्या नरेंद्र महाराज संस्थानच्या ८ आणि २ खाजगी रुग्णाहिका या ठिकाणी कार्यरत आहेत.रामदास आठवले यांची भेटकेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी दुपारी भेट दिली. सावित्री पूल घटनास्थळावर जाऊन त्यांनी पाहणी केली; त्यानंतर मदत केंद्राला भेट देऊन मदत कार्याची माहिती घेतली.