मतदार जनजागृतीसाठी गीतमाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सिडीचे प्रकाशन
By निखिल म्हात्रे | Published: April 2, 2024 05:10 PM2024-04-02T17:10:39+5:302024-04-02T17:11:31+5:30
रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
निखिल म्हात्रे, अलिबाग : रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मतदार जनजागृतीसाठी गीतमाला तयार करण्यात आली आहे. या गीतांच्या सिडीचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या प्रकाशन सोहळ्यास अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील, तहसिलदार म्हसळा, समीर घारे आदि उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपला सहभाग नोंदवावा यासाठी या गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समीर घारे यांनी या गीतांची निर्मिती केली आहे. एकूण 6 गीते असून पारंपरिक चालीवर असलेल्या या गीतांचे लेखन, गायन भिमराव सूर्यतळ यांनी केले असून संगीत सचिन धोंडगे यांनी दिले आहे. सहकलाकार म्हणून प्रतिक निकम, आदेश डेरवणकर आणि किरण शिंदे यांनी काम केले आहे. या गीतमाला सिडीची निर्मिती नायब तहसिलदार धर्मराज पाटील, तहसिलदार समीर घारे यांनी केली आहे. ही संपूर्ण निर्मिती शासकीय अधिकारी कर्मचारी यांची आहे.