चिर्ले एमटी यार्डमध्ये मिलनासाठी एकत्र आलेल्या दोन नर-मादी अजगरांची मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:33 PM2023-11-29T16:33:26+5:302023-11-29T16:33:54+5:30
वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडून नैसर्गिक आवासात सोडून दिले
मधुकर ठाकूर, उरण: चिर्ले येथील एका एमटी कंटेनर यार्डमध्ये बुधवारी (२९) सकाळी मीटिंगसाठी एकत्र आलेल्या दोन नर-मादी अजगर आढळून आले होते.एकाच वेळी एकाच ठिकाणी आढळून आलेल्या नरमादी अजगरांना वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी मोठ्या शिताफीने पकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नैसर्गिक आवासात सोडून दिले.
बुधवारी सकाळीच उरण तालुक्यातील चिर्ले येथील एका एमटी कंटेनर यार्डचे सुपरवायझर कुणाल पाटील यांनी यार्डमध्ये भले मोठे अजगर आढळून आले असल्याची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना दिली होती.वनजीव संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी सदस्य नितीन मढवी,साहिल घरत यांनी माहिती मिळताच एमटी कंटेनर यार्डकडे धाव घेतली. या कंटेनर यार्डमध्ये कंपाऊंडच्या बाजूलाच दोन नरमादी अजगर मिलनासाठी एकत्र आल्याचे आढळून आले.
एक ९ फुट लांबीचा नर आणि ८.५० फूट लांबीची मादी असे आढळून आलेल्या दोन इंडियन पायथॉन जातीच्या नरमादी अजगरांना संस्थेच्या सदस्यांनी शिताफीने पकडले.
आढळून आलेल्या दोन्ही नरमादी अजगरांची माहिती वनजीव संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाला दिली.वन
अधिकारी संतोष इंगोले यांनी दोन्ही अजगरांची तपासणी केली.तपासणीनंतर दोन्ही नरमादी अजगरांना चिर्ले येथील दुधेला डोंगराच्या नैसर्गिक आवासात वनधिकारी यांच्या समक्ष मुक्त करण्यात आले.