जाळ्यात अडकून पडलेल्या दुर्मिळ ब्राह्मणी घारीची सुटका; वनविभागाच्या दिलं ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 06:22 PM2021-09-14T18:22:34+5:302021-09-14T18:22:47+5:30
उरण तालुक्यातील वेश्वी गावातील रहिवासी लक्ष्मण मुंबईकर यांनी गावकुसाबाहेर मासळी संवर्धनासाठी तलाव खोदला आहे
मधुकर ठाकूर
उरण : मासळी संवर्धनासाठी खोदलेल्या तलावाच्या सभोवार संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून पडलेल्या दुर्मिळ ब्राह्मणी घारीला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी मोठ्या शिताफीने सुटका केली आहे.
उरण तालुक्यातील वेश्वी गावातील रहिवासी लक्ष्मण मुंबईकर यांनी गावकुसाबाहेर मासळी संवर्धनासाठी तलाव खोदला आहे.मासळी असलेल्या तलावाच्या संरक्षणासाठी काठाच्या सभोवताली नायलॉनची जाळी लावण्यात आल्या आहेत.तलावातील मासे खाण्यासाठी दुर्मिळ ब्राह्मणी घार तलावाच्या दिशेने झेपावली.मात्र मासे खाण्याच्या प्रयत्नात संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकली. पाय, पंख जाळ्यात अडकल्याने सुटकेसाठी घारीचे जोरदार प्रयत्न सुरु होते.मात्र सुटकेच्या प्रयत्नात जाळ्यात आणखीनच अडकत चालली होती.
सुदैवाने लक्ष्मण मुंबईकर हे तलावाची पाहणी करण्यासाठी आले होते. जाळ्यात अडकुन पडलेली आणि जाळ्यातून सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी दुर्मिळ ब्राह्मणी घारीची सुरू असलेली धडपड त्यांच्या दृष्टीस पडली.मुंबईकर यांनी तत्काळ वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंद मढवी यांच्याशी संपर्क साधुन माहिती दिली.मढवी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.जीव वाचवण्यासाठी जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ ब्राह्मणी घारीची जीवाच्या आकांताने धडपड सुरू होती.
आनंद मढवी आणि त्यांच्या शुभम मढवी, मनीष मढवी,मयूर मढवी, पीयूष लोंगळे,विनीत मढवी, पंकज घरत, दिलीप मढवी, बंटी शेळके, सुमित मढवी, नितीन मढवी, महेश भोईर, अभिमन्यू पाटील, रुपेश भोईर, बाळा कोळी, सुनील नाईक आदी सहकाऱ्यांनी अधिक वेळ दवडता जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ ब्राह्मणी घारीची मोठ्या प्रयासाने सुटका केली. त्यानंतर आनंद मढवी यांनी दुर्मिळ ब्राह्मणी घारीची माहिती वनविभागाला दिली.वनक्षेत्रपाल शशांक कदम,एस. बी. इंगोले, हरिदास करांडे, आर. एस. पवार, श्रीमती आशा वाळे, डी.डी. पाटील आदी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घारीची प्राथमिक आरोग्य तपासणी केली.तपासणीत शरीराला कोणत्याही प्रकारची दुखापत,जखम झाली नसल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर दुर्मिळ ब्राह्मणी घारीला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांच्या मदतीने दुधेला जंगलात नैसर्गिक आवासात मुक्त करण्यात आले.