तेल कंपनीचे जहाज फुटल्याने मासे किना-यावर, सोशल मीडियावर अफवांना पेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:17 AM2017-10-05T02:17:52+5:302017-10-05T02:18:31+5:30
तालुक्यातील समुद्रकिना-यावर चार दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने मासे आले होते. त्यामुळे मच्छीमारांची चांगलीच चंगळ झाली होती; परंतु समुद्रामध्ये तेल कंपनीचे मोठे जहाज फुटल्याने मासे किनारी आले आहेत
अलिबाग : तालुक्यातील समुद्रकिना-यावर चार दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने मासे आले होते. त्यामुळे मच्छीमारांची चांगलीच चंगळ झाली होती; परंतु समुद्रामध्ये तेल कंपनीचे मोठे जहाज फुटल्याने मासे किनारी आले आहेत, तसेच ते मासे आरोग्यास घातक असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आल्याने मासळी उद्योगावर परिणाम झाला आहे. सोशल मीडियावर अशा अफवा पसरवणाºयांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी रायगड जिल्हा कोळी समाजाने केली. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना बुधवारी दिले.
समुद्रातील अंतर्गत हालचालींमुळे चार दिवसांपूर्वी पाकट जातीचे मोठे मासे नवगाव, सासवणे, मांडवा किना-यावर आले होते. विशेषत: नवगावच्या समुद्रकिनारी ते मोठ्या संख्येने आले होते. सुमारे ४० वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. अशा घटना घडणे म्हणजे त्सुनामी, अथवा भूकंप होण्याचे संकेत असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे.
मोठ्या प्रामाणात मासे मिळत असल्याने अर्थकारण चांगलेच वधारले होते. त्यातच हे मासे आरोग्यास अपायकारक असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने मासे खाण्यावर बंधन आली. त्यामुळे व्यवसाय संकटात सापडून मच्छीमारांवार उपासमारीची वेळ आली आहे. दिवसाला कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाल्याचे संघटनेचे सहचिटणीस प्रवीण तांडेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाच्या साधनावर घाला घालणाºयांना शासन झालेच पाहिजे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी अध्यक्ष धर्मा घारबट, मदन कोळी, मिलिंद कोळी यांच्यासह अन्य पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण आणि मत्स्य विभागाचे शिक्कामोर्तब ‘मासे खा’
किनाºयावर मोठ्या प्रमाणात आलेल्या माशांमुळे उलटसुलट चर्चा असताना, मात्र हे मासे खाण्यासाठी आरोग्याला हानिकारक नसल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिला आहे, तसेच हवामानातील नैसर्गिक बदलामुळे मासे किनाºयावर आले आहेत. ते मासे आरोग्यास अपायकारक नाहीत. कोणतेही जहाज बुडून केमिकल गळती झालेली नाही, असे मत अलिबाग येथील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी जिल्ह्यातील विविध मच्छीमार संस्थांना पत्र पाठवून कळवले आहे.