रिलायन्सने निर्माण केले टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ते, पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 04:59 AM2020-01-30T04:59:59+5:302020-01-30T05:00:26+5:30

प्लास्टिकचा प्रश्न हा दिवसेंदिवस गहन होत आहे.

Reliance created waste plastic from roads, useful research for environmental protection | रिलायन्सने निर्माण केले टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ते, पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त संशोधन

रिलायन्सने निर्माण केले टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ते, पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त संशोधन

Next

अलिबाग : जगभरात प्लास्टिकची समस्या गंभीर रूप धारण करत असल्याने त्यावर विविध देशांमध्ये संशोधनही सुरू आहे. प्लास्टिक मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्लास्टिकच्या समेस्येवर नागोठणे येथील रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीने नामी उपाय शोधला आहे. टाकाऊ प्लास्टिकपासून थेट रस्ते निर्माण करण्याचा फार्म्युला त्यांनी संशोधनाअंती विकसित केल्याचा दावा केला आहे. याआधी असे प्रयोग झाले आहेत. मात्र, त्याची अंंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे प्रचलित रस्त्यांवर होणाऱ्या खर्चात प्रतिकिलोमीटरला ४० लाख रुपयांची बचत होणार असल्याने सरकारने यामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे.

प्लास्टिक हे पर्यावरणाला घातक आहे, त्याचा फटका हा नागरिकांना तसेच प्राण्यांनाही बसताना आपण नेहमी पाहत असतो. त्याचबरोबर ठिकठिकाणी प्लास्टिक कचºयाचा ढीग डम्पिंग मैदानावर पसरलेला असतो. काही ठिकाणी डम्पिंग मैदानातील कचरा जाळण्याचे प्रकार होतात. त्यामुळे त्यातून विषारी वायू बाहेर पडून ते मानव आणि एकूणच पर्यावरणाला अत्यंत घातक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने एक पाऊल पुढे टाकून ग्राहकांनी वापरून टाकलेल्या प्लास्टिकचा रस्ता बांधण्यासाठी उपयोग केला आहे. कंपनीतील ४० कि.मी.चा रस्ता हा प्रायोगिक तत्त्वावर बांधला आहे. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने सरकारने या पुढे रस्ते निर्माण करताना या तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे रिलायन्स पेट्रोकेमिकल बिझनेसचे सीओओ विपुल शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्लास्टिकचा प्रश्न हा दिवसेंदिवस गहन होत आहे. मानवाला लागणाºया प्रत्येक खाद्यपदार्थ, चैनीच्या वस्तू, कॉस्मेटिक यामध्ये प्लास्टिकचा वापर केलेला असतो; परंतु वस्तू वापरून झाल्यानंतर प्लास्टिक हे कचºयात फेकून दिले जाते. त्यामुळे वातावरणालाही प्लास्टिकची हानी पोहोचत असते. ग्राहकांनी वापरून फेकून दिलेले प्लास्टिकपासून रस्ता निर्माण करण्याची संकल्पना कंपनी व्यवस्थापनाने अमलात आणण्याचा निर्णय घेतला असल्याकडे शहा यांनी लक्ष वेधले.

कंपनीने वेफर्स, खाद्यपदार्थ पॅकिंग फिल्म्सचे प्लास्टिक, साध्या पॉलिथिन पिशव्या, ई-कॉमर्स वापरातील मटेरियल, कचºयाच्या पिशव्या, अन्य बहु-उपयोगी प्लास्टिक यांचे बारीक तुकडे करून ते खडी आणि डांबरमध्ये मिसळून त्याचा वापर रस्त्यासाठी करण्यात आला आहे, असे शहा यांनी सांगितले. याप्रसंगी नागोठणे रिलायन्सचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, अजय शहा, चेतन वाळंज, रमेश धनावडे, श्यामकांत चितळे, अजिंक्य पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

रस्त्याची क्षमता आणि टिकाऊपणा वाढला
रिलायन्स कंपनीने तयार केलेले टाकाऊ रस्त्याचे हे मॉडेल सामाजिक बांधिलकीतून ग्रामीण भागातही असे रस्ते तयार करण्यासाठी सरकारसमोर मांडण्यासाठी कंपनी प्रशासन प्रयत्न करणार आहे.
रस्त्याच्या साहित्यात प्लास्टिकचा वापर केल्याने रस्त्याची क्षमता आणि टिकाऊपणा वाढून दर्जाही सुधारला असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. 
टाकाऊ प्लास्टिकपासून तयार केलेले रस्ते हे पर्यावरणपूरक आहेत. नजीकच्या कालावधीत ही संकल्पना अधिक लोकाभिमुख आणि अधिक व्यापक होण्यासाठी सरकारचा यामध्ये महत्त्वाचा सहभाग असणे फारच गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

नागोठणे येथे ५० टन टाकाऊ प्लास्टिकपासून ४० किमीचा रस्ता
नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या परिसरातील अशा पद्धतीने तब्बल ४० किमीचे रस्ते तब्बल ५० टन टाकाऊ प्लास्टिक वापरून तयार करण्यात आलेले आहेत.
मे २०१९ रोजी रस्त्याच्या बांधकामास सुरु वात करून दोन महिन्यांत ते पूर्ण करण्यात आले आहेत. जिल्ह्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून अनेक ठिकाणचे रस्ते हे खड्डेमय झाले; परंतु नागोठणे येथे अडीच हजार मि.मी. पाऊस पडूनही कंपनीत प्लास्टिकपासून निर्माण केलेल्या रस्त्याला एकही खड्डा पडलेला नाही.
डांबरीपासून बनविलेल्या रस्त्यापेक्षा टाकाऊ प्लास्टिकपासून तयार केलेल्या एक किलोमीटर रस्त्याच्या खर्चात एक लाखांची बचत होत असल्याकडे शहा यांनी लक्ष वेधले.
रिलायन्स कंपनीत बनविलेल्या रस्त्याच्या कामासाठी बहुतांश प्लास्टिक हे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधून गोळा केले आहे.

Web Title: Reliance created waste plastic from roads, useful research for environmental protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग