खोपोली : मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीचीआराम बस सोमवारी दरीत कोसळताना कठडा व एका झाडामुळे वाचली. बसमधून एकूण ३५ जण प्रवास करीत होते.ऐरोलीतील एका कंपनीतील कर्मचारी खासगी बसने सकाळी सहलीसाठी निघाले होते. सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास बोरघाटातील शिंगरोबानंतरच्या अवघड वळणावरून पुढे जाताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. आराम बस अचानक मागे जाऊ लागली. बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. बस आता वेगात जाऊन दरीत कोसळणार असे चित्र दिसत होते. परंतु बसने कठडा तोडल्यानंतर एका झाडाला बस अडकली व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बोरघाट पोलीस, आयआरबी व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, मितेश शाह व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास मदत केली.>झाडामुळे वाचले प्राण - साठेलकर
बोरघाटात आज ३५ प्रवाशांचे प्राण वाचले. यापूर्वीही ३ वेळा झाडाला वाहने अडकल्यामुळे जीवितहानी टळली होती. त्यामुळे झाडांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या गुरुनाथ साठेलकर यांनी ‘ लोकमत’ शी बोलताना सांगितले.