नेरळ : कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतीमध्ये बेडीसगाव ही आदिवासी वाडी असून त्या वाडीच्या सात उपवाड्या आहेत. त्यातील वाघिणीची वाडी उंच दुर्गम भागात असून तेथे जाण्यासाठी रस्ता नाही आणि वीजही नाही. त्या दुर्गम भागातील वाडीला जात असलेल्या दोन वृद्ध महिला पूल नसलेला नाला पार करताना अडकून पडल्या होत्या. तब्बल दोन तासांनी त्या आदिवासी वृद्ध महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. जास्त पाऊस असेल त्या काळात वाघिणीच्या वाडीतील मुलांची शाळा बंद असते. त्यामुळे नाल्यावर तत्काळ पूल बांधण्यात यावा, अशी मागणी आदिवासी संघटनेने केली आहे.बेडीसगावपासून पुढे डोंगर भागात असलेली वाघिणीची वाडीच्या सभोवताली वनजमीन आहे. ४ जुलै रोजी वाघिणीची वाडी येथे हाशीबाई ढुमणे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराला तेथून दोन तासांवर असलेल्या बेडीसगाव येथील मथी ढुमणे आणि काशीबाई वाघ या दोन आदिवासी वयोवृद्ध महिला जाण्यास निघाल्या होत्या. पावसाचा जोर असल्याने त्या दोन महिला नाला पार करीत असताना मध्ये अडकून पडल्या. त्या दोघी सोबत असल्याने नाल्यात वाहून गेल्या नाहीत. त्यांचा त्या नाल्यातील पाण्याबरोबर दोन तास खेळ सुरू होता. डोक्यावर छत्री धरू शकत नाही आणि समोर मृत्यू अशा स्थितीत त्या महिला होत्या. त्याचवेळी नेरळ बेकरेवाडी येथील आदिवासी तरु ण देखील अंत्यसंस्काराला जाण्यास निघाले होते. बेडीसगाव आणि वाघिणीची वाडीच्या मध्ये असलेल्या नाल्यात दोन महिला पाण्यात उभ्या असल्याचे त्यांना दिसून आले. बेकरेवाडीतील जैतू पारधी, सुरेश निरगुडा, हेमा पारधी, चाहू पारधी, प्रकाश पारधी यांनी थेट नाल्यात उतरून त्या दोन्ही महिलांना बाहेर काढले. नंतर ते सर्व वाघिणीची वाडी येथे पोहचले. त्या दोन्ही महिलांना बाहेर काढण्यात महत्वाची भूमिका बजावणारे कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे अध्यक्ष जैतू पारधी यांनी आदिवासी विभागाने तेथे तत्काळ पूल बांधून द्यावा, अशी मागणी केली असून आदिवासी संघटना रस्ता आणि पुलाचा प्रश्न सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
नाल्यात अडकलेल्या वृध्द महिलांची सुटका
By admin | Published: July 06, 2016 2:29 AM