कर्नाळा बँकेच्या प्रलंबित विमा लाभार्थी ठेवीदारांना दिलासा; 237 ठेवीदारांना मिळणार 67 लाख
By वैभव गायकर | Published: May 22, 2024 07:00 PM2024-05-22T19:00:10+5:302024-05-22T19:01:54+5:30
पाच लाखापर्यंतच्या 237 ठेवीदारांचे 67 लाख रुपये अडकले आहेत.
पनवेल : कर्नाळा बँकेच्या प्रलंबित विमा ठेवीदारांना येत्या सोमवारपासून दि.27 रोजी पासुन परतावा मिळण्यास पुन्हा प्रारंभ होत आहे. पाच लाखापर्यंतच्या 237 ठेवीदारांचे 67 लाख रुपये अडकले आहेत. तो मार्ग पनवेल संघर्ष समितीने मोकळा केला आहे. हे पैसे बँक ऑफ बडोदाच्या ताडदेव शाखेत पडून आहेत. साडेपाचशे कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या कर्नाळा बँकेचे ठेवीदार परताव्यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्याकडे डोळे लावून बसले आहेत. शेकडो ठेवीदारांना बुडीत बँकेतील पैसे परत मिळवून देण्याचा कडू यांनी अल्पवधीत महाराष्ट्रात इतिहास रचल्याने पन्नास हजार ठेवीदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्यातील 237 ठेवीदार परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत.
काही तांत्रिक कारणे आणि नामसाधर्म्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीचा सामना त्यांना गेल्या दोन वर्षात करावा लागला आहे. मधल्या काळात बँक ऑफ बडोदाच्या, ताडदेव शाखेतील कर्मचार्यांच्या बदल्यांमुळे कर्नाळा बँकेच्या प्रलंबित ठेवीदारांना पैसे मिळण्यात अडसर निर्माण झाला आहे. यासंदर्भात कांतीलाल कडू यांनी बडोदा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिले होते. तसेच रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता.
याशिवाय कर्नाळा बँकेचे अवसायक बालाजी कटकधोंड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण म्हात्रे यांच्याकडे पाठपुरावा सातत्याने सुरु होता. कटकधोंड आणि म्हात्रे यांनी बडोदा बँकेत जावून चौकशी केली. कडू यांनी दिलेल्या पत्राची आठवण करून देत तेसुद्धा त्यांच्यासमोर ठेवले. तेव्हा बडोदा बँकेतील कर्मचार्यांच्या बदलीमुळे हे प्रस्ताव रखडलेले असल्याचे सांगत येत्या सोमवारपासून पुढच्या 15 दिवसात ही प्रकरणे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.