पेणमधील धार्मिक स्थळे हटविली
By admin | Published: January 1, 2017 03:33 AM2017-01-01T03:33:44+5:302017-01-01T03:33:44+5:30
राज्यभरात मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर असलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश न्यायालयाने पारित केल्यानंतर या आदेशाचे पालन करण्याचे फर्मान संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना
पेण : राज्यभरात मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर असलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश न्यायालयाने पारित केल्यानंतर या आदेशाचे पालन करण्याचे फर्मान संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने महानगर पालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित पालिका प्रशासनाला पाठविण्यात आले व त्यावर तातडीने अंमलबजावणी व्हावी असे न्यायालयाचे आदेश आहेत.
पेण तहसीलदार कार्यालयात धार्मिक स्थळांवर अधिकार असलेल्या वाहतूक संघटना, नगर पालिका प्रशासन, पोलीस अधिकारी व तहसीलदार यांच्यात बुधवारी बैठक झाली. यावेळी परिसरातील चार धार्मिक स्थळे स्वयंस्फूर्तीने हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी सकाळी वाहतूक संघटनांनी धार्मिक स्थळे हटविण्याचा सुरुवात केली होती. यामध्ये पेण नगर परिषदेच्या लगतचे अष्टविनायकाचे चालक मालक संघटनेचे साईमंदिर, एमएसईबीजवळील साईकृपा टेम्पो चालक मालक संघटनेचे साईमंदिर, राजू पोटे मार्गावरील, ओमसाई चालक मालक व श्री गजानन चालक मालक संघटनांची छोटी मंदिरे हटविण्यात आली. (वार्ताहर)