साईकोंड येथे उत्खननात प्राचीन मंदिराचे अवशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:00 AM2020-02-16T01:00:14+5:302020-02-16T01:00:31+5:30
वस्तुसंग्रहालयासाठी ग्रामस्थांचा प्रयत्न । बाराव्या शतकातील शिल्प असल्याचा अंदाज
गिरीश गोरेगावकर
माणगाव : तालुक्यातील साई गावजवळील साईकोंड येथील एका लहानशा टेकडीवर साधे कौलारू पद्धतीचे शिवमंदिर होते. त्याची खूप पडझड झाली होती. तेथे दर्शनासाठी शिवभक्त जात होते. तेथेच शिवमंदिराजवळ वीरगळ व सतीशिळेसारखे अवशेष होते. नुकतेच या शिवमंदिराचा साईकोंड गावातील ग्रामस्थ व शिवभक्तांनी जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. या जीर्णोद्धारासाठी इमारतीच्या बांधकामासाठी खड्डे खणण्यास सुरुवात केली. त्या वेळी अनेक प्राचीन शिल्प अढळून आले. हे अवशेष बाराव्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज कोकणातील इतिहास आणि संस्कृती यावर अभ्यास करणारे डॉ. अजय धनावडे यांनी व्यक्त केला.
साईकोंड येथील ग्रामस्थांनी त्वरित संपर्क साधून डॉ. अजय धनावडे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर डॉ. अजय धनावडे हे आपल्या विशेष पथकासह शिवमंदिर साईकोंड येथे आले. सुमारे १५ दिवस त्यांनी उत्खननाचे काम सुरू ठेवले. त्यानंतर प्राचीन मंदिराचे एक एक अवशेष बाहेर काढण्यात आले. हे अवशेष बाराव्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज धनावडे यांनी व्यक्त केला.
साई हे गाव माणगावच्या पश्चिमेस सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. या अवशेषांमध्ये रेखीव कलात्मक मकरप्रणाल, काही सुस्थितीतील असलेले तर काही भग्नावस्थेतील वीरगळ, सतीशिळा, द्वारशाखा, उंबऱ्याचे अवशेष, खांबांचे तळखडे, भग्नावस्थेत असलेले तरी ठसठशीतपणे उठून दिसणारे गजलक्ष्मी शिल्प, सिद्धवीरांच्या प्रतिमा, नंदी, मराठा काळातील गणेश मूर्ती, पालीयाचे स्मृती दगड असे एक नाही अनेक प्राचीन वास्तू अवशेष सापडले. त्यावरून येथे एक प्राचीन मंदिर उभे होते, असा त्यांनी निष्कर्ष काढला.
शिलाहार काळात या परिसरात शैव, वैष्णव, शाक्त पंथाचा चांगलाच प्रभाव होता. हे दाखवणारे अनेक पुरावे या परिसरात उपलब्ध झाले आहेत. येथील स्तंभांच्या तळखड्यावर असलेली नृसिंह, महिषासुरमर्दिनी यांची शिल्पे याचीच प्रतीके आहेत. आढळलेले गजलक्ष्मी शिल्प हे समृद्धी व सुबत्तेचे प्रतीक मानावे लागेल. वीरगळ म्हणजे हा प्रदेश ताब्यात ठेवण्यासाठी, येथील गोधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी मृत्युमुखी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ उभारला गेलेला स्तंभ होय. शेती आणि गवताळ कुरणे यांनी कृषीसंपन्न तसेच फळफळावळ, झाडेझुडपे तसेच निसर्गरम्य व असलेला हा परिसर दहाव्या शतकानंतर व्यापारामुळे भरभराटीला आला होता. हे ठिकाण समुद्री सपाटीपासून
५०० मीटर अंतरावर आहे.
‘शिल्पांचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करा’
1इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासक डॉ. अजय धनावडे यांनी येथील ग्रामस्थांना या पुरातन अवशेषांचे महत्त्व समजावून सांगितले आणि येथे असलेल्या अवशेषांची हेळसांड होऊ नये तसेच आपला हा वारसा पुढील पिढ्यांसाठी टिकून राहवा म्हणून या मूर्ती-शिल्पांचे एका वस्तुसंग्रहालयात रूपांतर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
2शिवमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रामस्थांनी स्वयंभू श्री शंकर मंदिर ट्रस्ट साईकोंड या नावाने एक धर्मादाय संस्था निर्माण केली असून, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना मंदिराजवळच एक दालन उभारून त्यात हे अवशेष संग्रहालय रूपाने जपून ठेवण्याचा निश्चय केला आहे. साईकोंड येथील गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करून दानशूर व इतिहासप्रेमी लोकांनी या संस्थेस उदार हस्ते मदत करावी, असे आवाहन केले आहे.
काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या बहिशल विभागाकडून तेथूनच जवळ असलेल्या चांदोरे येथे झालेल्या उत्खननात आढळलेल्या पुरातन अवशेषावरून ही बाब जास्तच स्पष्ट झाली आहे. पूर्वीपासूनच परदेशाशी समुद्रमार्गे सुरू असलेला व्यापार शिलाहार काळातदेखील सुरू होता. त्यामुळेच श्रीवर्धन या बंदरावरून लिंगा किंवा देवघाटाने पठारी प्रदेशात जाणाºया व्यापारीमार्गावर साई हे गाव असल्याने साईगावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असावे.
- डॉ. अजय धनावडे, इतिहास
आणि संस्कृती अभ्यासक
च्साई हे गाव दिघी माणगाव पुणे या महामार्गावर असून, साईकोंड हे केवळ १ किमी अंतरावर वसलेले एक छोटेसे खेडे आहे. शासनाने या प्राचीन अवशेषांची दखल घेऊन त्यांचे संग्रहालय उभारण्यासाठी आर्थिक निधी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
च्ही मागणी पूर्ण झाल्यास या परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊन या भागात रोजगारनिर्मिती होईल. या मतदारसंघाच्या आ. आदिती तटकरे या पर्यटन खात्याच्या राज्यमंत्री असल्याने त्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.