महाड दुर्घटनेतील एसटी बसचे अवशेष सापडले

By Admin | Published: August 6, 2016 12:30 PM2016-08-06T12:30:22+5:302016-08-06T13:18:08+5:30

सावित्री नदीतील शोधकार्याच्या चौथ्या दिवशी एसटी बसचे अवशेष हाती लागले आहेत. घटनास्थळापासून 3 किमी अंतरावर विसावा हॉटेलजवळ एसटीचे अवशेष सापडले आहेत

The remains of the ST bus of the Mahad accident | महाड दुर्घटनेतील एसटी बसचे अवशेष सापडले

महाड दुर्घटनेतील एसटी बसचे अवशेष सापडले

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत - 
महाड, दि. 6 - सावित्री नदीतील शोधकार्याच्या चौथ्या दिवशी एसटी बसचे अवशेष हाती लागले आहेत. घटनास्थळापासून तीन किमी अंतरावर विसावा हॉटेलजवळ एसटीचे अवशेष सापडले आहेत. पुल पडल्यानंतर एसटी बस वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर शोधकार्य सुरु करण्यात आलं होतं, मात्र एसटी बसचा काहीच पत्ता लागत नव्हता. अखेर चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बसचे काही अवशेष सापडले आहेत. 
 
मंगळवारी रात्री म्हणजे 2 ऑगस्ट रोजी ११.३०च्या सुमारास महाड-पोलादपुरला जोडणारा सावित्री नदीवरील जुना ब्रिटीशकालीन पूल कोसळला. यावेळी पुलावर असलेल्या दोन एसटी बससह काही वाहने वाहून गेली असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. 
 
एसटीची रत्नागिरी आगाराची जयगड- मुंबई आणि राजापूर आगाराची राजापूर- बोरिवली या दोन बस चिपळूण बसस्थानकातून मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजता सुटल्या होत्या. चिपळूणमध्ये या दोन्ही बसचे चालक- वाहक बदलून चिपळूण आगाराचे कर्मचारी देण्यात आले. महाड बसस्थानकावर या बस रात्री बारा वाजता पोचणे अपेक्षित होते. मात्र, त्या पोचल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही बस पुलावरून कोसळून नदीत बुडाल्याच्या शक्‍यतेने खळबळ उडाली होती.
 
दरम्यान  शनिवारी शोधकार्य सुरु केलं असता दोन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा 24 वर पोहोचला आहे. गुरुवारी म्हणजेच दुर्घटनेच्या दुस-या दिवशी एकूण १४ मृतदेह हाती लागले होते. तर शुक्रवारी 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं होतं. मृतांचा आकडा 22 वर पोहोचला असून आज तो वाढण्याची शक्यता आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे आजही शोधकार्यात अडथळे येत आहेत. 
 

शनिवारी सकाळी शोधकार्य सुरु केल्यावर म्हाप्रळच्या खाडीत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या दिनेश कांबळी यांचा असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत एकूण 24 मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. एका कारचे अवशेषही शुक्रवारी नौदल आणि एनडीआरएफच्या हाती लागले होते. गाडीचे अवशेष तवेरा कारचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या कारसोबत एक चटई आणि इतर सामानही हाती लागलं आहे.

गुरुवारी महाड पट्ट्यात आणि समुद्र किना-यांवर दुर्घटनाग्रस्तांचे मृतदेह सापडले होते. तर शुक्रवारी  केंबुर्ली, वावे, गोरेगाव, दादली खाडीपर्यंत वाहून गेलेले मृतदेह सापडले. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे इतर बेपत्ता व्यक्ती कदाचित समुद्रापर्यंत वाहत गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
 
(महाड पूल दुर्घटना - लोकमतने ३ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा)
 
महाड-पोलादपूरला जोडणा-या या पुलाच्या दुरावस्थेकडे लोकमतने तीनवर्षापूर्वीच लक्ष वेधले होते. नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटीशकालीन पूल अखेरची घटका मोजत असून, हा पूल धोकादायक बनला आहे असे वृत्त लोकमतने ३ सप्टेंबर २०१३ च्या हॅलो रायगड पुरवणीत दिले होते.  

(महाड दुर्घटनेतील कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार)
 
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील या पुलाची मुदत संपल्याचे ब्रिटीश एजन्सीने संबंधित यंत्रणेला सूचित केल्याच्या वृत्ताला त्यावेळी संबंधिक अधिका-यांनी दुजोरा दिला होता. पुलाच्या दगडी बांधकामामध्ये पिंपळाच्या झाडाचे साम्राज्य पसरले होते. 

Web Title: The remains of the ST bus of the Mahad accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.