आरोग्य केंद्रामधील गैरसोयी दूर करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:26 AM2018-02-24T00:26:36+5:302018-02-24T00:26:36+5:30
बोर्ली पंचतन आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असून, येथील गैरसोयी टप्प्याटप्प्याने दूर करू
बोर्ली पंचतन : बोर्ली पंचतन आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असून, येथील गैरसोयी टप्प्याटप्प्याने दूर करू, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी केले. बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची होत असलेली गैरसोय पाहण्यासाठी अदिती तटकरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली त्या वेळी त्या बोलत होत्या.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन हे महत्त्वाचे गाव आजूबाजूच्या सुमारे २५ गावांसाठीच्या २० ते २२ हजार जनतेसाठी बोर्ली पंचतन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जुन्या असलेल्या इमारतीच्या जागीच सुमारे १० वर्षांपूर्वी नवीन देखणी इमारत तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने उपलब्ध झालेल्या निधीतून उभारण्यात आली; परंतु त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने ही इमारत अद्यापही ठेकेदाराकडून जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आलेली नाही व तरी देखील पहिल्या मजल्यावरील इमारतीचे स्लॅब कोसळलेले, शस्त्रक्रियागृह अद्यापही कार्यरत नाही, वैद्यकीय अधिकारी व इतरही महत्त्वाची पदे रिक्त त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याने अनेकदा विविध प्रकारे याबाबत येथील लोकप्रतिनिधींसह बोर्ली पंचतन ग्रामपंचायतीने तक्र ाररूपी पत्रव्यवहार करूनही याबाबत जिल्हा प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे नवनियुक्त उपसरपंच मंदार तोडणकर तसेच ग्रामपंचायत सदस्य नंदू पाटील, चंद्रकांत तोडणकर तसेच ग्रामस्थ सुजित पाटील, विष्णू धुमाळ व इतर यांनी राजिप अध्यक्षा अदिती तटकरे यांची भेट घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होत असलेल्या गैरसोयींची पाहणी करण्याची विनंती के ली होती.त्यानुसार अध्यक्षा अदिती तटकरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्या समवेत जि.प. सदस्या सायली तोंडलेकर, पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक, गटनेत्या मीना गाणेकर, सरपंच गणेश पाटील, उपसरपंच मंदार तोडणकर, महमद मेमन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, युवकाध्यक्ष सिद्धेश कोसबे, उपाध्यक्ष सचिन किर, माजी सभापती लाला जोशी, स्वाती पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी संपूर्ण इमारतीची पाहणी अध्यक्षा अदिती तटकरे यांनी केली. यामध्ये शस्त्रक्रि या गृहामध्ये त्रुटी असल्याने ते कार्यरत करता येत नसल्याची माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी सचिन देसाई यांनी दिली तर रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात येते, परंतु येत्या कालावधीमध्ये बोर्ली पंचतन आरोग्य केंद्रासाठी रिक्त असलेले एक पद भरण्याबाबत निश्चित प्रयत्न होतील, असेही देसाई यांनी सांगितले.