लोकमत न्यूज नेटवर्क पेण : हमरापूर विभागातील गणेशमूर्ती बनविण्याऱ्या कार्यशाळांमध्ये उत्साही माहोल दिसून आला. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मूर्तिकारांचे नुकसान होऊ नये यासाठी २०२१या वर्षात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनविण्यावर घातलेली बंदी वर्षभरासाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती माध्यमांमध्ये प्रसारित झाल्याची माहिती मिळताच हमरापूर विभाग गणेशमूर्ती संघटनेने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे अभिनंदन केले आहे.
बाप्पा धावला आणि बाप्पा पावला अशा संदेशाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसून आल्या. गतवर्षातील मार्चमध्ये टाळेबंदी जाहीर झाल्यापासून पेणच्या गणेशमूर्ती बनविण्याचे मुख्य केंद्र असलेल्या हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे या कलानगरीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती ज्या बाकी राहिल्याने मूर्तिकारांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्तींचा महापूर नैसर्गिक चक्रीवादळ या सर्व आव्हानांना सामोरे जावे लागले. बँकांकडून काढलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, गणेशोत्सवापूर्वी मोठ्या गणेशमूर्तीवर बंदी आल्याने त्या मूर्तीची विक्री थांबली. कुशल अकुशल कामगार रोजगारापासून वंचित राहिला. दररोज येणारे ग्राहक थांबल्यावर मूर्तिकारांवर आर्थिक संकट कोसळले. २०२० वर्षाचा उत्पन्नाचा लेखाजोखा पूर्णपणे कोलमडून पडला. अशावेळी या संकटाचा सामना करण्यासाठी मे २०२०मध्ये जोहे येथे राज्यभरातील मूर्तिकार एकवटून प्लास्टर ऑफ पॅरिस वर केंद्र सरकारने घातलेल्या बंदी विरोधात लढा देण्यासाठी एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अभय म्हात्रे यांची महाराष्ट्र राज्य गणेशमूर्ती संघटनेचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तेव्हापासून मूर्तिकलेवर आलेलं संकट दूर करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी परिश्रम केले. महिनाभरापूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुंबई मुक्कामी भेट घेऊन आपल्या मूर्तिकलेच्या व्यवसायात झालेल्या आर्थिक हानी व राज्यभरात या व्यवसायावर आधारित कामगार यांचा बुडालेला रोजगार मूर्तिकारांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान याबाबत वस्तुनिष्ठ माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ऐकून घेतले. त्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर काय परिणाम होतो यासाठी केंद्र सरकारकडून अभ्यास गटामार्फत वस्तुनिष्ठ परीक्षण केले जाईल, असे आशिष शेलार यांच्यासोबत आलेल्या राज्यव्यापी मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते. नववर्षारंभी याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वर्षभरासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनविण्यावरील बंदीला तूर्तास स्थगिती दिली आहे.
‘लोकमत’ने वेळोवेळी घेतला आढावा
‘लोकमत’ने गणेशमूर्ती कलाविश्वाचा लेखाजोखा वेळोवेळी प्रसिद्ध केला आहे. आता वर्षभरासाठी पीओपीच्या मूर्तीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याने सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.
स्वसामर्थ्यावर निर्माण केलेला व्यवसाय व या व्यवसायावर अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातील कलाकार कामगारानंसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचे महाराष्ट्र राज्य गणेशमूर्ती संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे यांनी सांगितले.