पंतप्रधानपद डोक्यातून काढून टाका; शिवसेना सरकारमध्ये समाधानी नाही- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 06:43 PM2017-11-07T18:43:20+5:302017-11-07T18:45:56+5:30
कर्जत : सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे 2019 हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी पंतप्रधान बनण्याचा विचार डोक्यातून काढून टाका. प्रफुल्ल पटेल यांनी हा मुद्दा उगाच उपस्थित केल्याचे ते म्हणाले.
कर्जतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिंतन शिबीराप्रसंगी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना शरद पवार यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मला दहा दिवसांपूर्वी भेटले. त्यांनी तुमची राजकीय भूमिका काय आहे असे विचारले. यावर मी त्यांना म्हणालो, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा, आम्ही आमची भूमिका जाहीर करतो. यावरुन मला असे वाटतेय की, सध्या भाजपा सरकारमध्ये शिवसेना समाधानी नाही. याबरोबर आम्ही फक्त फक्त समविचारी पक्षांशी युती करु, असे शरद पवार यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांना त्यांचा पक्ष महाराष्ट्रात वाढवायचा आहे. भाजपाला दूर ठेवून पक्षवाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते सरकारमधून बाहेर पडतील, अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे कौशल्य आहे. कष्ट करण्याची तयारी आहे. मात्र, त्यांनी सातत्य ठेवले पाहिजे. सध्या राहूल गांधी यांच्या सभांना जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियामध्येही राहूल यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळेच भाजपा सुद्धा राहूल यांना गांभिर्याने घेऊ लागला आहे, असेही शरद पवार म्हणाले.