अलिबाग कुलाबा किल्ल्यावरील अनाधिकृत मदार हटवा; सरखेल कान्होजी आंग्रेंच्या वंशजांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 08:37 PM2022-01-07T20:37:28+5:302022-01-07T20:38:34+5:30
अलिबाग येथील कुलाबा किल्ला आणि सरसगड येथे अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत मदार बांधली आहे. या अनधिकृत मदार त्वरित हटविण्याची मागणी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : अलिबाग येथील कुलाबा किल्ला आणि सरसगड येथे अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत मदार बांधली आहे. या अनधिकृत मदार त्वरित हटविण्याची मागणी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी केली आहे, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली. रायगड किल्ल्यावरील मदार मोर्चा चे प्रकरण ताजे असतानाच आता कुलाबा किल्ल्यावरील मदार चर्चेत आली आहे.अलिबागच्या समुद्रात उभा असलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सागरी राजधानी म्हणून ओळखला जाणाऱ्या कुलाबा किल्ल्यावर एक नवीनच प्रार्थनास्थळ उभे राहिल्याकडे आंग्रे यांनी लक्ष वेधले आहे.
माघी गणेश जयंतीच्या उत्सवाच्या वेळी मंडपाचे खांब उभारण्यासाठी आक्षेप घेणारे पुरातत्व खात्याचे अधिकारी थेट किल्ल्याच्या तटबंदीवर हे अनधिकृत बांधकाम होत असताना कोणत्या अतिमहत्वाच्या कामगिरीवर व्यस्त होते? असा संतप्त सवालच त्यांनी उपस्थित केला आहे.
पुरातत्वीय महत्वाच्या किल्ल्यावर आणि परिसरात अशा प्रकारे अनधिकृत पणे बांधकामे, अतिक्रमणे, कब्जा करून एक नवीनच पायंडा पाडण्यात येत आहे. हे घातक असल्याने वेळीच रोखले पाहीजे असेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले