सुगवे शाळेची इमारत बंद असल्याने पत्रे काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 02:49 AM2018-08-12T02:49:48+5:302018-08-12T02:50:01+5:30
कर्जत येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बंद असल्याचा फायदा घेऊन छपराचे पत्रे काढून नेण्यात आले आहेत. दरम्यान, पत्रे कोणी काढून नेले याची माहिती कर्जत पंचायत समितीला नसल्याने इमारतीवर नक्की कोणाचा कब्जा आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कर्जत : येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बंद असल्याचा फायदा घेऊन छपराचे पत्रे काढून नेण्यात आले आहेत. दरम्यान, पत्रे कोणी काढून नेले याची माहिती कर्जत पंचायत समितीला नसल्याने इमारतीवर नक्की कोणाचा कब्जा आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुगवे येथे रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे. विद्यार्थी वाढल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तेथे मुरबाड रस्त्याजवळ एक इमारत बांधली. दोन वर्गखोल्यांच्या इमारतीत अनेक वर्षे विद्यार्थी बसत होते. मात्र, नव्याने इमारत बांधण्यात आल्यानंतर मुरबाड रस्त्यालगत असलेली इमारत बंद ठेवण्यात आली होती. त्याचा फायदा घेऊन काही अज्ञात लोकांनी शाळेच्या इमारतीच्या छपरावर असलेले ३० सिमेंट पत्रे काढून नेले आहेत. त्याची माहिती ना सुगवे गावाच्या बोरीवली ग्रामपंचायतीला ना कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला. त्यामुळे सुगवे येथील प्राथमिक शाळेचा कारभार नक्की कसा चाललाय? याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुगवे शाळेच्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने त्या इमारतीचा ताबा कोणी अन्य घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केवळ शाळेच्या छपराचे पत्रे काढून नेण्यात आले असले तरी पुढील काळात तेथे इमारत होती का? याचा कोणताही पुरावा तेथे राहणार नाही? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषदेने वर्ग खोल्या बांधण्यासाठी केलेला खर्च लक्षात घेता केवळ शाळेची जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण विभाग, बांधकाम विभागाने त्याकडे लक्ष दिले नाही तर सध्या इमारतीचे केवळ पत्रे गेले आहेत. मात्र, पुढील काळात त्या जागेवर एखादी वास्तू उभी राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही.