पनवेल करप्रणालीची होणार पुनर्रचना
By admin | Published: September 12, 2015 11:23 PM2015-09-12T23:23:46+5:302015-09-12T23:23:46+5:30
शहरातील पायाभूत सुविधा त्याचबरोबर विकासकामांवर भर देण्यात येत असताना दुसरीकडे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार करप्रणालीची पुनर्रचना
- वैभव गायकर, पनवेल
शहरातील पायाभूत सुविधा त्याचबरोबर विकासकामांवर भर देण्यात येत असताना दुसरीकडे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार करप्रणालीची पुनर्रचना करण्याचे काम पनवेल नगरपालिकेने हाती घेतले असून मालमत्ता सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यानुसार सर्व माहिती अद्ययावत करण्यात येणार असून डिसेंबरअखेर काम पूर्ण होणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पनवेलमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी कर वसुलीवर अधिकाधिक भर द्यावा लागत आहे. शहरात जवळपास बारा कोटींच्या आसपास महसूल जमा होत असून त्यामध्ये मालमत्ता करापासून, पाणीपट्टी, मलनि:सारण, शिक्षण, पर्यावरण अशा विविध प्रकारांतून मिळणाऱ्या करांचा समावेश आहे.
फेब्रुवारी महिन्यापासूनच कर वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी कामाला लागतात. पूर्वी पालिकेत येवून कर अदा करावा लागत होता. आता महसुलात वाढ व्हावी त्याचबरोबर थकबाकी कमी होऊन जनतेची गैरसोय टाळण्याकरिता ‘ई-पेमेंट सिस्टीम’ सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता पालिकेच्या वेबसाईटवर सर्व माहिती संकलित करण्यात आली असून मालमत्ताधारक ई -बँकिगच्या साह्याने कराची रक्कम अदा करता येते.
महसुलाबरोबर उत्पन्नात भर टाकण्याकरिता प्रशासनाने पाऊल टाकले आहे. विशेषत: मालमत्तेचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच प्रशासनाच्या हाती नवीन डाटा उपलब्ध होणार असून त्यानुसार कररचनेत बदल करण्यात येणार आहे.
बेकायदा बांधकामांचाही सर्व्हे
पनवेल शहरात कित्येक इमारती आणि सदनिकाधारकांनी अतिरिक्त बांधकाम केले आहे. त्याचबरोबर अंतर्गत बदल केले असून त्यामध्ये बाल्कनी, प्लॉवर बेड आदी गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर काही इमारतीत नव्याने बांधकाम करून क्षेत्रफळ वाढवले आहे. त्याबाबत पालिका दरबारी नोंद नाही. या सर्वेक्षणात जास्तीच्या बांधकामाची माहिती प्राप्त होणार आहे. त्यानुसार संबंधिताच्या करात वाढ करता येणे शक्य होणार आहे.