- संजय करडेमुरु ड जंजिरा - मुरु ड नगरपालिकेची बाजारपेठेतील शाळा नंबर-१ ही १०० वर्षे जुनी आहे. शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, कलावंत या शाळेने घडवले आहेत. मात्र, सध्या शाळेची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे शाळेच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.चार वर्षांपासून सुरू असलेले काम पूर्ण होत नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत ठेकेदाराकडे विचारणा केली असता, वाळू मिळत नसल्याचे उत्तर देण्यात आले. लोकप्रतिनिधींचेही याबाबत दुर्लक्ष होत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येतआहे.आगामी शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी नवीन इमारतीचे काम होणे गरजेचे आहे. शाळेच्या जुन्या इमारतीतील जिना, पीलर जीर्ण झाले असून लाद्याही तुटल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.मुरुड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, नगरपालिकेच्या १ नंबर शाळेचे काम चार वर्षांपासून रखडवल्यामुळे सदरील ठेकेदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार होतो; परंतु ठेकेदाराच्या विनंतीवरून त्याला मुदतवाढ देण्यात आली असून, जून महिन्यापर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.शाळा क्रमांक १ कोळी वाड्यालगत आहे, त्यामुळे येथील मुले या ठिकाणी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. शाळा १०० वर्षे जुनी असल्याने नूतनीकरणाची गरज आहे, अन्यथा मुलांच्या जीवास धोका उद्भवू शकतो. नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी या वेळी पालकांकडून होत आहे.शाळेची नवीन इमारतीसाठी जिल्हा नगरोत्थानमधून ५६ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. ठेकेदाराकडून चार वर्षांपासून काम रखडल्याने त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत येत्या जून महिन्यात नवीन इमारतीमध्ये मुलांना शिक्षण घेता येईल, यासाठी प्रयत्न करू.- दयानंद गोरे, मुख्याधिकारी,मुरु ड नगरपरिषद
चार वर्षांपासून रखडले शाळेचे नूतनीकरण, जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 1:53 AM